
अवघ्या देशाला हादरवणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडात आफताब पूनावालाविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले आहेत. आफताब अमीन पूनावाला याच्यावर त्याची लिव्ह इन पार्टनर श्रद्धा वालकर हिची हत्या करणे आणि त्यानंतर पुरावे नष्ट करण्याचा आरोप आहे.
वसईतून दिल्लीत आलेल्या आफताबने 2022च्या मे महिन्यात श्रद्धाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून मेहरोलीच्या जंगलात फेकून दिले. क्रूरकर्मा आफताबचे हे विकृत हत्याकांड नोव्हेंबरमध्ये उघडकीला आल्यामुळे देशभरात खळबळ उडाली होती. सतत पोलिसांची दिशाभूल करण्यात आफताब यशस्वी झाला होता. हत्याकांड उघड झाल्यानंतर काही दिवसांनी मेहरोलीच्या जंगलात सापडलेल्या हाडांचा डीएनए श्रद्धाच्या वडिलांच्या डीएनएशी जुळल्यामुळे आफताब विरोधात पोलिसांना सबळ पुरावा मिळाला होता. त्याचा आधार घेऊन पोलिसांनी आफताबविरुद्ध खटला दाखल केला होता. तपासादरम्यान, त्याची पॉलिग्राफ आणि नार्को चाचणी केल्यानंतर त्यातही त्याने हत्येची कबुली दिली होती.
मंगळवारी दिल्ली येथील साकेत न्यायालयात आफताबला हजर करण्यात आलं. आफताबवर भारतीय दंड विधानाच्या कलम 302 (सदोष मनुष्यवध) आणि कलम 201 (पुरावे नष्ट करणे) हे दोन आरोप निश्चित करण्यात आले आहेत. आता आफताबवर या दोन्ही कलमांतर्गत खटला चालणार आहे.


























































