महाराष्ट्रातील समृद्ध लोकभावना, संगीत परंपरा आणि सांस्कृतिक वैभवाचा उत्सव साजरा करण्यासाठी ‘श्रावणरंग’ या विशेष सांस्कृतिक सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे. 16 ऑक्टोबर रोजी गोरेगाव येथील जयप्रकाश नगरातील नंदादीप विद्यालयातील डॉ. भानुबेन नानावटी कलाघर सभागृहात सायंकाळी 7 वाजता हा सुरेल प्रवास सोहळा पार पडणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विविध सांस्कृतिक रंगांची आणि लोकपरंपरांची अनुभूती देणाऱया गीत-संगीताचा जागर रसिकांसमोर उलगडणार आहे. हा उपक्रम सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशीष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. या सोहळय़ात नचिकेत देसाई, केतकी भावे-जोशी आणि प्रीती निमकर-जोशी हे गायक कलाकार आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करणार असून असून त्यांना विनय चेऊलकर, सागर साठे, विजय तांबे, मयूरेश शर्लेकर, मनीष पुंबरे आणि पंकज धोपावकर हे संगीतकार वाद्यसाथ देणार आहेत. कार्यक्रमाची संकल्पना व संयोजन स्वरवंती क्रिएशन्सच्या अवंती देसाई यांचे असणार आहे. तसेच प्रकाश योजना विलास हुमणे, ध्वनी संयोजन विराज भोसले आणि कार्यक्रमाचे निवेदन व सुसंवाद विघ्नेश जोशी हे करणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी दिली.
























































