।। श्री शंकरगाथा ।।

>> चैतन्यस्वरूप

नगर येथे सरदार नानासाहेब मिरीकर यांच्या घरी श्रीमहाराजांचा मुक्काम होता. संध्याकाळी भोजनादी कार्यक्रम आटोपून अन्य भक्त मंडळींसह श्रीमहाराज निवांत बसले होते. श्रीमहाराज नगर येथे जेव्हा कधी येत असत तेव्हा त्यांच्या काही निवडक भक्तांच्या घरी त्यांचा मुक्काम होत असे आणि ही पर्वणी साधून अन्य सर्व भक्तदेखील तेथे एकत्र जमत असत. श्रीमहाराजांसमवेत त्या सर्वांचा विविध विषयांवर वार्तालाप होत असे. त्या दिवशीही अनेक भक्तमंडळी उपस्थित होती, अध्यात्मविषयक चर्चा रंगली होती. श्रीमहाराज ज्ञानेश्वरीतील काही संदर्भ व दाखले देत होते, श्रोतेगण श्रवणानंदामध्ये गुंतून गेले होते आणि अशातच, रात्र कधी सरली अन् पहाट कधी झाली याचे भान कुणालाही राहिले नाही. कोंबडा आरवला तेव्हा दिवस उगविण्याची वेळ झाल्याचे सर्वांना जाणवले. या अध्यात्ममैफलीचा समारोप करताना नानासाहेब मिरीकर म्हणाले, `श्रीमहाराज, आपले व्यक्तित्व अगाध आहे, अमर्याद आहे आणि अवर्णनीयदेखील आहे. आपणच जर का असे दिव्यस्वरुप आहात तर आपले श्रीगुरू कसे असतील?’ नानासाहेबांनी हे वाक्य बोलण्याचा केवळ अवकाश! श्रीमहाराज ताडकन गुडघ्यावर उभे झाले. त्यांनी डावा हात मागे नेला, उजवा हात वरच्या दिशेने फैलावला आणि आकाशाकडे नजर रोखून मोठ्याने उद्गारले, `माझे गुरू आहेतच असे !!!’ आणि थेट समाधीवस्थेत स्थिरावले. तब्बल दीड तास श्रीमहाराज एकाच स्थितीत होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंची संततधार वाहू लागली, त्यामुळे त्यांच्या अंगावरचे कपडे भिजून गेले होते. श्रीमहाराजांची ही भावावस्था पाहून उपस्थित भक्तगण भयभीत झाले. `आपण श्रीमहाराजांना हा प्रश्न उगीचच विचारला आणि त्यायोगे त्यांना त्रास दिला’ अशी खंत मिरीकरांच्या मनाला चाटून गेली. ते वारंवार श्रीमहाराजांचरणी वंदन करून अपराधी भावनेने, `महाराज आम्हांला क्षमा करा’ असे म्हणू लागले. परंतु, इथे श्रीमहाराज कमालीचे आनंदित दिसत होते. पुढे समाधीवस्थेतून बाहेर येताना श्रीमहाराज नानासाहेबांना म्हणाले, `तुमचे काही चुकले नाही. उलट तुमच्यामुळे मला माझ्या श्रीगुरूंचा आठवण झाली. तुमच्यामुळेच मला माझ्या गुरूंचे दर्शन घडले, स्मरणिंचतन झाले त्यामुळे तुम्ही याविषयी स्वत:स अपराधी मानून घेऊ नये उलट तुम्ही प्रश्न विचारल्यामुळे आम्ही स्वत:च `धन्य’ झालो आहोत.’

सोलापूर येथील शुभराय मठाच्या सभामंडपामध्ये श्रीमहाराजांसोबत भस्मेकाका, जनुबुवा, बाबूराव रुद्र, दादा फुलारी, भावे वकील वगैरे मंडळी बसली होती. अशाप्रकारे जर कधी ही भक्तमंडळी अध्यात्मविषयक चर्चेकरिता बसली तर त्या चर्चेचे अध्यक्षपद श्रीमहाराजांना देण्यात येत असे आणि हे नित्यनेमाने ठरलेले असल्यामुळे अध्यक्षस्थानी असलेले श्रीमहाराज गादीवर लोडाला टेकून बसले होते आणि अन्य भक्तमंडळी त्यांच्या सभोवती बसली होती. तेवढ्यात श्रीमहाराज जनुबुवांना म्हणाले, `बुवा, पानसुपारी काढ’. त्यावेळी बुवांचे खिसे रिकामे होते. तसे त्यांनी श्रीमहाराजांना सांगितले. मात्र श्रीमहाराजांनी त्यांचा हेका कायम ठेवला हे पाहून जनुबुवांनी कोटाच्या खिशात हात घातला असता त्यांना कोटाचे खिसे पानसुपारीने गच्च भरल्याचे दिसून आले. हे पाहून बुवांसह सर्वजण चक्रावून गेले. अखेरीस खिशात सापडलेले पानसुपारी आदी साहित्य व्यवस्थित कुटून भक्तांनी उत्तम प्रकारचा विडा तयार केला आणि श्रीमहाराजांस खावयास दिला.

अकलूजच्या सासवड शुगर फॅक्टरीमधील बॉयलर दरवर्षी बिघडत असे तेव्हा त्या बॉयलरचे उत्पादन करणाऱ्या जर्मन कंपनीतर्फे येणारा मॅकेनिक बॉयलरची दुरुस्ती करीत असे. हे काम साधारणत: 5-6 दिवस काम चालत असे. `बॉयलर’वर सातत्याने खर्च होत होता त्याशिवाय अन्य संबंधित खर्चदेखील वाढत होते. हे नेहमी घडणारे प्रकार थांबावे म्हणून श्रीमहाराज तिथे आले अन् त्यांनी सांगितले की, `कशाला निष्कारण खर्च करता, हा बॉयलर मी नीट करून देतो.’ आणि त्यानंतर श्रीशंकर महाराजांनी सतत तीन दिवस बॉयलरवर घणाचे घाव घातले. अखेरीस बॉयलर दुरुस्त झाला आणि तो आजपावेतो कधीही बिघडला नाही.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या