
सामना ऑनलाईन । पोर्ट ऑफ स्पेन
मी फलंदाजीसाठी कोणत्याही एका विशिष्ट क्रमांकाची मागणी केलेली नाही आणि भविष्यात करणारही नाही. संघव्यवस्थापन सांगेल त्या नंबरवर फलंदाजी करण्याची माझी तयारी आहे, असे स्पष्टीकरण धडाकेबाज मुंबईकर फलंदाज आणि सध्या वेस्ट इंडीज दौर्यावर टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करणार्या श्रेयस अय्यरने केले आहे. विंडीज दौर्यावर हिंदुस्थानी संघव्यवस्थापन चौथ्या क्रमांकावर प्रभावी कामगिरी करू शकेल अशा फलंदाजाच्या शोधात आहे त्यावर तुझे काय मत आहे ? या पत्रकारांच्या सवालाला उत्तर देताना श्रेयसने हे मत व्यक्त केले.
वन डे संघात स्थान मिळवण्यासाठी सध्या श्रेयसला यष्टिरक्षक –फलंदाज रिषभ पंत आणि के. एल. राहुल यांच्याशी स्पर्धा करावी लागत आहे. पण श्रेयसला आपल्या फलंदाजीच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. तो म्हणाला, संघव्यवस्थापन जो निर्णय घेईल तो मानून मी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करेन. कारण माझ्या खेळावर आणि क्षमतेवर माझा पूर्ण विश्वास आहे.मी स्वतः मला चौथ्या क्रमांकावर खेळवा अशी मागणी करणार नाही. संघाला गरज असेल त्या जागेवर खेळण्याची पूर्ण तयारी मी ठेवली आहे.
मिळालेल्या संधीचे सोने करणार
माझे वैयक्तिक मत विचारले तर संघात मला अमुक एका क्रमांकावर खेळवा असे सांगणे मला पटत नाहीय. संघात ज्या जागेवर फलंदाजी करायला मिळेल तिथे मी खेळेन. कारण एखाद्या क्रमांकापेक्षा स्वतःचा खेळ प्रभावी व्हायला हवा ही माझी धारणा आहे असे सांगून श्रेयस अय्यर पुढे म्हणाला, मिळालेल्या संधीचे सोने करण्याचा माझा निर्धार आहे. संघाला यश मिळवून देणे याला प्राधान्य देऊन खेळणे एवढेच मला कळते. पाच आंतरराष्ट्रीय वन डे डावांत दोन अर्धशतके झळकावणार्या श्रेयसला पूर्ण एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर टीम इंडियात पुन्हा स्थान मिळाले आहे. या संधीचे त्याला सोने करायचे आहे.




























































