
सामना प्रतिनिधी । पणजी
उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांना केंद्रीय मंत्रीमंडळात बढती देऊन गेल्या वेळच्या आयुष मंत्रालयाबरोबरच त्यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाची धुरा सोपवण्यात आली आहे. मोदी सरकारमध्ये संरक्षणमंत्री पद सांभाळणारे दिवंगत मनोहर पर्रिकर यांचा वारसा ते पुढे नेणार आहेत.
श्रीपाद नाईक हे राजनाथ सिंह यांच्या सोबत संरक्षण मंत्रालयाची धुरा सांभाळणार आहेत. मोदी यांनी गेल्यावेळी नाईक यांच्याकडे सुरूवातीला पर्यटन खाते सोपवले होते. त्यानंतर नव्याने तयार केलेल्या आयुष मंत्रालयाचा कारभार नाईक यांच्याकडे सोपवला होता. नाईक यांनी आयुष मंत्री म्हणून देशात आणि जगभरात योगा आणि आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसारात महत्वाची भूमिका बजावली होती. त्याची दखल घेत यावेळी त्यांच्याकडे आयुष मंत्रालय कायम ठेवण्यात आले आहे.
माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर गोव्यातील राजकीय गरज ओळखून संरक्षण मंत्री पद सोडून गोव्याच्या राजकारणात परतले होते.त्यानंतर मुख्यमंत्री पदावर असतानाच त्यांचे निधन झाले. पंतप्रधान मोदी आणि पर्रिकर यांचे घनिष्ठ संबध होते.


























































