बहीण जिवंत राहिली तर अकाली मृत्यू येईल! अंधश्रद्धाळू भावा बहिणीने मिळून लहान बहिणीची हत्या केली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंधश्रद्धेला बळी पडून भावा बहिणीने त्यांच्या लहान बहिणीला अत्यंत क्रूरपणे ठार मारले. देवीची साधना करणाऱ्या या बहीण भावाने नवरात्रीचा कडक उपवास धरला होता. देवीचा उत्सव भक्तिभावाने साजरा करणाऱ्या या बहीण भावाचा हात बहिणीला ठार मारताना अजिबात थरथरला नाही. आपली लहान बहीण जिवंत राहिली तर कुटुंबात अकाली मृत्यू होईल या भीतीपोटी त्यांनी आपल्या 15 वर्षांच्या बहिणीला ठार मारले. सदर प्रकार हा गुजरातमधील जामनगर जिल्ह्यातील ध्रोल गावात घडला आहे. 15 वर्षांची शारदा तडवी तिचा भाऊ राकेश आणि मोठी बहीण सविता हिच्यासोबत बिपीन बारैय्या यांच्या फार्महाऊसमध्ये राहात होती. बिपीन यांना राकेश आणि सविताचे वागणे अचानक बदलल्याचे जाणवले होते. यामुळे त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा त्यांना शारदाच्या हत्येबद्दल कळाले.

प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, राकेश आणि सविता हे दोघे प्रचंड देवभक्त होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून त्यांनी कडक उपवास धरला होता. शारदा आणि सविता या दोघींनी चामुंडा देवीची आराधना करण्यास सुरुवात केली होती. यावेळी बहुधा शारदा हिच्या अंगात आले होते आणि तिने शारदाने खूप पाप केले असून आता या पापाचा घडा भरला आहे, ती जिवंत राहिली तर कुटुंबात अकाली मृत्यू होती असे म्हणायला सुरुवात केली. हे राकेशने ऐकले होते. यानंतर राकेश आणि सविता या दोघांनी शारदाला बेदम मारहाण केली. राकेशने लाकडी दांडक्याने शारदाला मारले तर सविताने तिला अनेकवेळा भोसकले. यानंतरही हे दोघे थांबले नाहीत. त्यांनी शारदाला फरफटत बाहेर आणले आणि तिचं डोकं लोखंडी खाटेवर आणि भिंतीवर अनेकदा आपटले. ही तीन भावंडे बारैय्या यांच्या फार्महाऊसची देखभाल करत होती.