
कर्नाटकमध्ये अखेर काँग्रेसने भाकरी फिरवली आहे. अनेक महिन्यांच्या तर्कवितर्कानंतर व पक्षांतर्गत संघर्षानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. विद्यमान उपमुख्यमंत्री व पक्षातील वजनदार नेते डी. के. शिवकुमार हे त्यांची जागा घेणार आहेत.
कर्नाटकमधील प्रमुख नेत्यांची मंगळवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत बैठक झाली होती. याच बैठकीत पक्षनेतृत्वाने सिद्धरामय्या यांना राजीनामा देण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार आज सकाळी सिद्धरामय्या यांनी भावी मुख्यमंत्री शिवकुमार यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकाऩयांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पायउतार होत असल्याची घोषणा केली. त्यानंतर लोकभवनात जाऊन राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या सचिवांकडे राजीनामा सोपवला. राज्यपाल सध्या राज्याबाहेर असल्याने अद्याप राजीनामा मंजूर झालेला नाही, अशी माहिती राज्यपालांच्या कार्यालयाने दिली.
‘एका छोटया गावातून मी आलो आहे. कधी आमदार, विरोधी पक्षनेता आणि मुख्यमंत्री होईल असे वाटले नव्हते. मात्र पक्षानं संधी दिली. त्याबद्दल काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांचा ऋणी आहे,’ अशी भावना सिद्धरामय्या यांनी व्यक्त केली.
राज्यसभेची ऑफर नाकारली
‘हायकमांड आदेश देईल तेव्हा राजीनामा देईन हे मी आधीच स्पष्ट केले होते. त्यानुसार मी पद सोडले. माझ्यावर कुठलाही दबाव नव्हता किंवा मी नाराजही नाही, असे सिद्धरामय्या म्हणाले. ‘पक्षनेतृत्वाने मला राज्यसभेची खासदारकी देऊ केली होती. मात्र मी त्यास नम्रपणे नकार दिला, असेही त्यांनी सांगितले.





























































