आता 14 नाही 21 दिवसांचं विलगीकरण; या देशानं हिंदुस्थानातून परतणाऱ्या प्रवाशांवर लादले कडक निर्बंध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग हा चिंतेचा विषय बनला आहे. फेब्रुवारीपासून रुग्णांची संख्या विक्रमी वेगानं वाढत असल्यानं चिंतेत भर पडली आहे. हिंदुस्थानातून परतणाऱ्या प्रवाशांसाठी मात्र ही परिस्थिती अधिक तापदायक ठरत आहे. सिंगापूरच्या तज्ज्ञांनी सांगितले आहे की sars-cov-2 च्या दुसऱ्या म्युटेशननंतर जगभरात दहशत पसरली आहे. याविरोधात सर्वच देश आपली सुरक्षा मजबूत करू पाहात आहेत. याचा फटका मात्र हिंदुस्थानातून बाहेर देशात प्रवास करणाऱ्या व्यक्तींना बसत आहे. सिंगापूरमध्ये हिंदुस्थानातून येणाऱ्या प्रवाशाला 14 दिवसांच्याऐवजी 21 दिवसांपर्यंत विलगिकरणात ठेवण्यात येणार आहे. ‘द स्ट्रेट्स टाइम्स’ने गुरुवारी हे वृत्त प्रसिद्ध केली आहे. मात्र हिंदुस्थानातून येणाऱ्या विमानांना रोखण्याची आवश्यकता नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.

एनयूएस सॉ स्वी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे उपाध्यक्ष असोसिएट प्रोफेसर सू ली यांग यांनी म्हटले आहे की, ‘‘14 दिवसांचं केंद्रातील विलगिकरण आणि त्यानंतर पुढले सात दिवस घरातच राहण्याच्या नोटिस (एसएचएन) मधून 98 टक्क्यांहून अधिक Covid-19 चे रुग्ण वेळीच शोधण्यात यश मिळेल, तसेच विमानातून प्रवास करताना लागण झालेल्या व्यक्तींना वेळीच ओळखता येईल.”

यांग म्हणाले की, “21 दिवसांचं विलगिकरण आणि काही विशेष तपासणींमुळे संक्रमित प्रवासी ओळखता येतील. अर्थात यामुळे प्रवाशांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागणार आहे.”

सिंगापूरने मंगळवारी सुरक्षा उपाय योजनांची घोषणा करण्यात आली, ज्यामध्ये हिंदुस्थानातून परतणाऱ्या अनिवासी हिंदुस्थानींना कमीत कमी मंजूरी देण्यात येईल.

तज्ज्ञांनी सांगितले की, हिंदुस्थानातून परतणाऱ्या प्रवाशांना एखाद्या केंद्रावर 14 दिवस विलगिकरणात राहणे त्यानंतर आपल्याच घरी सात दिवस विलगिकरणात ठेवण्यात येईल.

हिंदुस्थानात सुरू असलेला कोरोनाचा प्रकोप लक्षात घेत सिंगापूरमध्ये परतणाऱ्या प्रवाशांसाठी हे नियम लागू असणार आहेत.