
राज्य कला संचालनालयाच्या अंतर्गत असलेल्या जे. जे. कला, जे.जे. उपयोजित कला या दोन महाविद्यालयाचा संचालनालयासोबतचा संबंध संपुष्टात आला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) या दोन महाविद्यालयांसोबतच येथील जे जे वास्तुशास्त्र महाविद्यालय अशा तीन महाविद्यालयांना डी-नोव्हा हा अभिमत विद्यापीठाचा दर्जा बहाल केला आहे.
यूजीसीने मान्यता दिल्यानुसार आता येथील तीनही महाविद्यालये ही सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाईन, मुंबई या नावाने ओळखले जातील. यात विद्यापीठ असा उल्लेख करता येणार नाही. तर पुढील तीन वर्षांसाठी प्रायोगिक तत्त्वावर मान्यता दिली असून या काळात रिक्त जागा, अभ्यासक्रम, प्रवेशाचे नियम, शुल्क रचना आदी यूजीसीच्या नियमांप्रमाणे ठरविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर पुढील पाच वर्षांत यूजीसीकडून आढावा घेतला जाईल त्यासाठी अटी शर्तीही निश्चित केल्या असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
यूजीसीने चित्र आणि शिल्पकलेचा वारसा जपणाऱया दोन महाविद्यालयांसोबत जे जे वास्तुकला महाविद्यालयाला डी-नोव्हाचा दर्जा तीन वर्षांच्या प्रायोगित तत्वावर दिला असून याचे मूठभर उद्योगपती आणि भांडवलदार समर्थक चित्रकांरानी स्वागत केले आहे. तर 160 वर्षांहून अधिक काळ वारसा जपलेली संस्था आता खासगी लोकांच्या ताब्यात गेल्याने तळागाळातील विद्यार्थ्यांना येथील कला शिक्षणाच्या पदवी, पदव्युत्तरचे लाखोंच्या शुल्करचनेमुळे दरवाजे कायमचे बंद होणार असल्याची प्रतिक्रिया कला क्षेत्रातील तज्ञांकडून उमटल्या आहेत.
पदवीवरून संभ्रम
यूजीसीने डी-नोव्हाला मान्यता देताना पदव्युत्तर प्रवेशासाठी स्पष्टपणे उल्लेख केला असला तरी पदवी प्रवेशाबाबत सूचनाच दिल्या नाहीत. शिवाय या संस्थेचा नवीन कारभार कधी सुरू करावा, यासाठीही मर्यादा दिली नसल्याने येत्या काळात याविषयी मोठा संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.
सर ज. जी. कला महाविद्यालय कलेचे जागतिक केंद्र व्हावे – केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान
देशाला चित्रकलेचा समृद्ध असा वारसा लाभला आहे. त्यानुसार 19 व्या शतकात स्थापन झालेल्या सर ज. जी. कला महाविद्यालयाने राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरील कलावंत घडविले आहेत. या महाविद्यालयाने हिंदुस्थानी ज्ञान, परंपरेचा वारसा संवर्धित करीत जागतिक कलेचे केंद्र व्हावे. त्यासाठी या महाविद्यालयास सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता विकास मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी महाविद्यालयाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन व सदिच्छा भेटीच्या कार्यक्रमावेळी केले.
























































