
कोरोना महामारीचा वाढता प्रकोप पाहता हिंदुस्थानच्या सिरम इन्स्टिटय़ूटने हिंदुस्थानसह जगातील गरीब देशांनाही कोरोना प्रतिबंधक लस पुरवण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी सिरमने अन्य कंपन्यांच्या सहकार्याने या लसीचे 100 दशलक्ष (सुमारे 10 कोटी) अतिरिक्त डोस बनवण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या भागीदारांमुळे पुण्याच्या सिरमला कोरोना लसींचे दर गरिबांनाही परवडतील असे ठेवणे शक्य होणार आहे. अन्य कंपन्यांच्या सहकार्यातून ही लस तयार केल्यास तिचा एक डोस 3 अमेरिकन डॉलर (सुमारे 221 रुपये) इतक्या किंमतीला देणे शक्य होईल, असे सिरमचे सीईओ आदर पूनावाला यांचे मत आहे.
हिंदुस्थानच्या सिरम इन्स्टिट्यूटने जगभरातील दुर्गम भागातील जनतेला आणि विशेषतः गरीब देशांनाही पुरवठा करणे शक्य व्हावे यासाठी आपल्या कोरोना प्रतिबंधक लसीचे 10 कोटी अतिरिक्त डोस बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सिरमने गावी, वॅक्सीन अलायन्स, सेपी आणि बिल अॅण्ड मेलिंडा फाऊंडेशन यांच्याशी सहकार्य करार करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे कोरोना लसीचे उत्पादन अधिक व जगभरातील नागरिकांना परवडेल अशा किमतीत करता येणे शक्य होईल, असे आदर पूनावाला यांनी सांगितले.

























































