
सामना प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतील बंद असलेल्या सहा कापड गिरण्यांच्या जागांवर पालिका लवकरच सहा अद्ययावत उद्याने उभारणार आहे. यासाठी पालिकेला ‘म्हाडा’कडून एकूण 3873.83 चौरस मीटरचे सहा भूखंड मिळणार आहेत. या भूखंडांच्या बदल्यात पालिका ‘म्हाडा’ला शिवडी येथील वेस्टर्न इंडिया लि. मिलची 3607.83 चौरस मीटर जागा देणार आहे. यामध्ये ‘म्हाडा’ला एका ठिकाणी मोठा भूखंड मिळाल्यामुळे गिरणी कामगारांच्या परवडणाऱ्या घरांचा प्रश्नही मार्गी लागणार आहे.
मुंबईतील बंद पडलेल्या कापड गिरण्यांच्या पुनर्विकासात प्रत्येकी एक तृतीयांश जागा गिरणी मालक, पालिका आणि ‘म्हाडा’ यांच्यात विभागणी करण्याचे धोरण ठरवण्यात आले आहे. यानुसार मनोरंजन मैदानाचा भाग आणि सार्वजनिक घरे, गिरणी कामगारांची घरे यासाठीच्या जागा एकमेकांलगत देण्यात येतात. परंतु पालिकेला उद्यानांसाठी मिळालेल्या या सहा भूखंडांचे क्षेत्रफळ लहान आणि विभागलेले असल्याने त्यावर मैदाने किंवा घरे बांधण्यास मोठय़ा प्रमाणात अडचणी येत होत्या. त्यामुळे सुधारित विकास नियंत्रण नियमावलीतील कलम 58(1) (ब) नुसार सूत गिरण्यांच्या पुनर्विकासांतर्गत ‘म्हाडा’ प्राधिकरणाला प्राप्त झालेल्या 6 लहान आकाराच्या भूखंडांची अदलाबदल करून त्या बदल्यात पालिकेच्या ताब्यातील एक संपूर्ण भूखंड ‘म्हाडा’ला गिरणी कामगारांच्या घरांसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या भूखंड हस्तांतरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या निर्णयामुळे ‘म्हाडा’ला शिवडी येथे गिरणी कामगारांसाठी मोठ्या प्रमाणावर घरे बांधणे शक्य होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव आगामी सुधार समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.
पालिकेच्या ताब्यातील शिवडीच्या वेस्टर्न इंडिया लिमिटेड -एम.एस.टी. सी. मिलची एकूण 3607.83 चौ.मीटर एवढी जागा आहे. तर ‘म्हाडा’च्या ताब्यातील सहा भूखंडांचे एकूण क्षेत्रफळ 3873.83चौ मीटर आहे. पालिकेच्या मिळणाऱ्या भूखंडांच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत ही जागा 265.98 चौरस मीटर अधिक आहे.
म्हाडाच्या एकूण 6 भूखंडांची किंमत 50,66,86,128 रुपये
पालिकेच्या एका भूखंडाची किंमत 47,40,68,862 रुपये
या ठिकाणी होणार उद्याने
मफतलाल, काळाचौकी – 481.43 चौ. मीटर
मातुल्य मिल, लोअर परळ – 388.30 चौ. मीटर
हिंदुस्थान मिल युनिट अ क ब, भायखळा – 542.10 चौ. मीटर
व्हिक्टोरिया मिल, लोअर परळ – 850 चौ मीटर
हिंदुस्थान मिल (क्राउन मिल), दादर – 602.15 चौ मीटर
एम.एस.टी.सी., काळाचौकी – 1009.83 चौ मीटर




























































