दहशतवादाला इथे जागा नाही! ‘एक्स’कडून हमास समर्थकांची अकाउंट्स बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स म्हणजेच आधीच्या ट्विटरने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. हमासला समर्थन देणाऱ्या किंवा हमासशी संबंधित एक्स अकाउंट बंद करण्यात आली आहेत.

एक्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिंडा याकारिनो यांनी याबाबत खुलासा केला आहे. त्या म्हणाल्या की, एक्स हे माध्यम लोकांमध्ये संवाद निर्माण व्हावा यासाठी काम करतं. अशा युद्धाच्या प्रसंगात एक्सच्या माध्यमातून प्रसारित होणाऱ्या कोणत्याही बेकायदेशीर आशयाप्रति अधिक काटेकोरपणे बघणं गरजेचं आहे. त्यामुळे दहशतवादी संघटना आणि हिंसक कट्टरतावादी गट यांना एक्सवर काहीही जागा नाही. त्यामुळे आम्ही अशी अकाउंट्स आढळल्यास ती बंद करत आहोत. आणि ही प्रक्रिया सुरू राहील, असं याकारिनो म्हणाल्या आहेत.

युरोपियन संघाचे उद्योगप्रमुख थिएरी ब्रेटन यांनी एलन मस्क यांना 24 तासांचा इशारा दिला होता. एक्सवर चुकीची माहिती प्रसारित होण्यापासून रोखावी आणि या संदर्भातील नवीन नियमावलीचं पालन करावं, असा इशारा ब्रेटन यांनी दिला होता. युरोपियन संघाने लागू केलेल्या नवीन नियमानुसार, एक्स आणि मेटा यांसारख्या मोठ्या समाज माध्यमांवर बेकायदेशीर आणि अवैध आशय हटवण्यात यावा आणि सार्वजनिक पातळीवर सुव्यवस्थेला धोका उत्पन्न होऊ नये, याबाबत काळजी घेण्यात यावी, असं लिहिण्यात आलं होतं. त्यानुसार एक्सने ही कारवाई केली आहे.