टूल किट म्हणजे काय? ते कशासाठी, कसे वापरतात?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेतकरी आंदोलनासंदर्भात टूल किट संपादित करून ते पुढे पाठवणाऱया बंगळुरूतील 22 वर्षीय पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी हिला दिल्ली पोलिसांनी अटक केली. दिशाने संपादित केलेले टूलकिट पुढे ग्रेटा थनबर्गनेही ट्विट केले, असा आरोप दिशावर ठेवण्यात आला आहे. दिशाच्या अटकेनंतर देशातील राजकारण चांगलेच तापले असून अनेकांच्या मनात टूल किटबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत.

कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत शेतकऱयांनी आंदोलन सुरू केले. आंदोलनाला दोन महिने उलटले तरी सरकारकडून ठोस आश्वासन मिळत नसल्याने शेतकऱयांनी प्रजासत्ताक दिनी ट्रक्टर रॅली काढली. त्यात हिंसाचार उफाळला आणि सरकारने आंदोलनस्थळी अधिक निर्बंध घातले. यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाद उमटले होते.

असे असते ‘टूल किट’…

जगात आंदोलने सुरू असतात, मग ते कुठलेही असो. आंदोलन करताना त्याचा एक कृती कार्यक्रम आखला जातो. आंदोलन आणखी पुढच्या टप्प्यावर नेणे वा तीव्र करण्याच्या उद्देशाने हे तयार केले जाते. ज्यामध्ये हा कृती कार्यक्रम नोंदवण्यात येतो, त्याला टूल किट म्हणतात. आंदोलनाची पोस्टर वा पत्रके अनेकदा बघायला मिळतात, ज्यात लोकांना आवाहन केले जाते. त्याचेच सोशल मीडियातील स्वरूप म्हणजे टूल किट.

टूल किटचा परिणाम काय होतो?

सोशल मीडियावर अनेक वेळा आपल्याला वेगवेगळे हॅशटॅग ट्रेडिंगमध्ये असल्याचे बघायला मिळते. एकाच वेळी अनेकांनी ट्विट करून तो हॅशटॅग वापरल्याने हा परिणाम दिसून येतो. टूल किटच्या माध्यमातून लोकांना समर्थन देण्याचे आवाहन करण्याबरोबरच त्या आंदोलनासंदर्भातील हॅशटॅग वापरून ट्विट करण्यासही सांगितले जाते. आंदोलनासंदर्भातील हॅशटॅग चर्चेत आल्यानंतर सोशल मीडियावरील लोकांचे याकडे लक्ष जाते. टूल किट फक्त आंदोलनासाठीच वापरली जाते असे नाही, तर राजकीय पक्षांकडून मोठय़ा कंपन्यांकडूनही त्याचा वापर केला जातो. विविध कार्यक्रमाप्रसंगी, अभियानावेळी वा एखाद्या घटनेनंतर टूल किटचा वापर केला जातो. ‘

‘टूल किट’चा वापर कशासाठी आणि कसा केला जातो?

ज्या लोकांच्या सहभागामुळे आंदोलनाची तीव्रता आणखी वाढू शकते वा त्यांची मदत आंदोलनासाठी होऊ शकेल अशा लोकांना सोशल मीडियावरून टूल किट शेअर केली जाते. आंदोलकांमध्ये समन्वय साधण्याचे काम टूल किटच्या माध्यमातून होते. त्याचबरोबर आंदोलनासंदर्भात काय लिहिले जाऊ शकते. कोणते हॅशटॅग वापरायला हवे. कोणत्या वेळेत ट्विट केल्यास फायदा होऊ शकतो आणि कुणाचा उल्लेख ट्विटमध्ये वा फेसबुक पोस्टमध्ये केल्यास प्रभावी ठरेल, अशी माहिती असते.