
जानेवारी 2022 ते एप्रिल 2023 या काळात सोलापूर शहरातील 117 अल्पवयीन मुली व पाचशेहून अधिक महिला बेपत्ता झाल्याची नोंद शहर पोलिसांत आढळते. दुसरीकडे ग्रामीणमधील तेराशेहून अधिक मुली-महिला बेपत्ता झाल्या आहेत. चिंतेची बाब म्हणजे दोन वर्षांत बेपत्ता झालेल्यांपैकी साडेपाचशेहून अधिक मुली-महिलांचा अजूनही शोध लागलेला नाही. मागील चार महिन्यांतील 119 मुलींचाही समावेश आहे.
प्रेमातून विवाहाचे आमिष, हलाखीची कौटुंबिक व आर्थिक परिस्थिती, आकर्षण, पालकांकडून विवाहाला किलंब, न आवडणाऱ्या मुलाशी पालकांनी विवाह ठरविणे अशा अनेक कारणांमुळे अल्पवयीन व 18 वर्षांवरील मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याचे प्रमाण जास्त आढळते. शहराच्या तुलनेत सोलापूर ग्रामीणमध्ये मुली-महिला बेपत्ता होण्याचे व पळून जाण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. सोलापूर शहरातून जानेवारी ते एप्रिल 2023 या काळात 35 अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले असून, त्यातील 11 मुली अजूनही सापडलेल्या नाहीत. दुसरीकडे ग्रामीणमधून चार महिन्यांत 84 मुली बेपत्ता झाल्या असून, त्यातील 32 मुली अद्याप सापडल्या नाहीत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिली.
‘ऑपरेशन मुस्कान’ कधी?
विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या निर्देशानुसार राज्यात ‘ऑपरेशन मुस्कान’ ही शोधमोहीम दरवर्षी राबवली जाते. पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अशासकीय संस्था, धार्मिक स्थळे, रुग्णालये, हॉटेल्स, दुकाने, रेल्वे स्टेशन, बस स्टॅण्ड अशा ठिकाणी हरवलेल्यांचा शोध घेतला जातो. पण, कोरोनामुळे या मोहिमेत सातत्य न राहिल्याने हरवलेले व सापडणाऱयांची संख्या कमी झाली आहे. आता ही मोहीम कधीपासून राबवली जाणार, याकडे लक्ष लागले आहे.
‘भरोसा सेल’ बिनभरोशाचा
प्रत्येक पोलीस ठाण्यात ज्येष्ठ नागरिक, बालके व महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी ‘भरोसा सेल’ अपेक्षित आहे. पण, सद्यःस्थितीत हे सेल कागदोपत्री आहेत, पण त्या ठिकाणी अपेक्षित कार्यवाही दिसत नाही. पोलिसांनी समुपदेशनातून अनेकांचे संसार जोडले, पण तक्रारदाराच्या अर्जावर कार्यवाही करताना पती-पत्नीपैकी एकजण जरी गैरहजर राहिला, तरी पुढे काहीच करता येत नाही. त्यामुळे महिला सुरक्षा कक्ष असो का भरोसा सेल यांच्याकडील अर्जांची पेंन्डन्सी दिवसेंदिवस वाढत आहे. पोलीस काय करतील, घरगुती भांडणात एवढी काय शिक्षा होणार, दोन पैसे दिले की काही होणार नाही, या आविर्भावात अनेकजण गैरहजर राहतात, ही वस्तुस्थिती असून, कौटुंबिक छळाला कंटाळूनही अनेकजणी घर सोडून निघून गेल्याचेही बोलले जात आहे.


























































