सोलापूर जिह्यात 37 साखर कारखाने गाळपाच्या शर्यतीत, सव्वादोन लाख हेक्टर ऊस उपलब्ध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर जिह्यात 37 साखर कारखान्यांनी ऊसगाळपासाठी परकानगी मागितली आहे. गाळपासाठी जिह्यात 2 लाख 30 हजार हेक्टर ऊस उपलब्ध असून, 200 लाख क्किंटल साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत जिह्यात 36 साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. 21 लाख 19 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून, 15 लाख 20 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

मागील दोन वर्षे झालेला पाऊस व उजनी धरणामुळे जिह्यातील ऊसक्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षी ऊस अतिरिक्त ठरल्याने एप्रिलपर्यंत कारखान्यांचा हंगाम सुरू होता. यंदाही तशीच परिस्थिती आहे. पण, कारखान्यांची संख्या वाढल्याने अतिरिक्त उसाचा प्रश्न राहणार नाही, असे चित्र आहे. परतीच्या पावसाने गाळप हंगाम 15 दिवस लांबणीवर पडला. यामुळे नोव्हेंबर महिन्यात गाळप हंगामाने वेग घेतला आहे.

शेतकरी संघटनांनी पहिली उचल 2700 रुपये देण्याच्या मागणीसाठी जिल्हाभर आंदोलन केले होते. जिल्हा प्रशासकीय बैठक निष्फळ ठरली. काही सहकारी कारखाने 2200 ते 2500 पर्यंत दर देण्यास तयार आहेत, पण खासगी कारखान्यांकडून दर जाहीरच करण्यात आलेला नाही. पंढरपूर तालुक्यात सद्गुरू साखर कारखान्याने 2500 प्रमाणे पहिली उचल शेतकऱयांच्या खात्यावर जमा केली आहे.

गेल्या 10 वर्षांतील गाळप पाहाता सोलापूर जिह्यात आतापर्यंत सर्वाधिक 33 साखर कारखान्यांनी गाळप केले आहे. पण यंदा मागील तीन ते चार वर्षे बंद असलेल्या साखर कारखान्यांनी गाळपाची तयारी केली आहे. यामध्ये बार्शी तालुक्यातील आर्यन (येडेश्वरी), पंढरपुरातील विठ्ठल सहकारी, अक्कलकोटमधील स्वामी समर्थ व मंगळवेढय़ातील फॅबटेक कारखान्यांचा समावेश आहे. या चार कारखान्यांसह 37 कारखान्यांनी गाळपाची परवानगी मागितली आहे. यामध्ये 15 सहकारी 22 खासगी कारखान्यांचा समावेश आहे.