सोलापूरातील मोहोळ शहरात अग्नितांडव, पाच दुकाने जळून खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील कुरुल रस्त्यावर असणाऱया शॉपिंग सेंटरला आग लागून पाच दुकाने जळून खाक झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली आहे. दरम्यान, आग लागण्याची 15 दिवसांतील ही दुसरी घटना असून, कोरोनाच्या संकटात आगीची भर पडल्याने येथील व्यावसायिक निराश झाले आहेत.

मोहोळचे माजी सरपंच बिलाल शेख यांचे थोरले बंधू जुबेर शेख यांचे कुरुल रोडवर नवीन एमएसईबीसमोर शॉपिंग सेंटर आहे. त्यात 5 गाळे आहेत. या गाळ्यांमध्ये जेकेरिया शेख यांचे बॉम्बे इलेक्ट्रॉनिक, रोहिणी संतोष नरगिडे यांची नरगिडे पॅथॉलॉजी लॅब, सचिन राठोड यांचे बालाजी गॅस शेगडी रिपेअरिंग, सुनील कार्यकर्ते यांचे सिद्धनागेश किराणा स्टोअर्स, तर विशाल ऑटो गॅरेज अशी दुकाने आहेत. सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अचानक या दुकानांना आग लागली. आगीची माहिती कळताच, लोकनेते साखर कारखाना तसेच लोकमंगल कारखान्याच्या अग्निशमन बंबांनी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत सर्व दुकाने जळून खाक झाली होती.

मी वर्धमान फर्टिलायझरमध्ये कामाला होतो. मात्र, कंपनी बंद झाल्यामुळे कुटुंब चालविण्यासाठी नातेवाईकांकडून हातउसने पैसे घेऊन तसेच बायकोचे सोने गहाण ठेवून पैसे उभे केले. त्यानंतर किराणा दुकान टाकले. मात्र, आगीमुळे सर्वच उद्ध्वस्त झाले असून, कुटुंब रस्त्यावर आले आहे. नोकरी नाही आणि दुकानही नाही अशा विचित्र परिस्थितीत अडकलो आहे. – सुनील कार्यकर्ते, व्यावसायिक.

सोलापूर येथे लॅबमध्ये कामाला होते. मात्र, पती मोहोळ येथे कामाला असल्याने चारच महिन्यांपूर्वी पॅथॉलॉजी लॅब सुरू केली. उसने पैसे घेऊन मशीन, फ्रीज व फर्निचर इतर साहित्य खरेदी केले. मात्र, आगीमुळे सर्वच उद्ध्वस्त झाले.  – रोहिणी नरगिडे, नरगिडे पॅथॉलॉजी