औद्योगिक वसाहतीसाठी सोलापूर महापालिका उभारणार अग्निशमन केंद्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर येथील अक्कलकोट रोड एमआयडीसीसह नीलमनगर, अशोक चौक, विजयनगरातील उद्योगांसाठी आता पाण्याच्या टाकीजवळील जागेत महापालिकेच्या वतीने अग्निशमन केंद्र उभारले जाणार आहे. औद्योगिक वसाहत यंत्रणेने सुचविलेल्या तीन जागांपैकी एक जागा महापालिकेने अखेर निश्चित केली आहे.

सोलापूर शहरात रविवार पेठ, भवानी पेठ, सावरकर मैदान, होटगी रोड व अक्कलकोट रोड या पाच ठिकाणी अग्निशमन केंद्रे आहेत. सध्या अग्निशमन केंद्रांकडे दहा गाडय़ा असून, एक मिनी फायटर वाहन व दोन फोम टेंडर फायर फायटर गाडय़ा आहेत. अपुरे मनुष्यबळ असतानाही अग्निशमन विभागप्रमुख केदार आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील 416 आगी विझविण्यात आल्या आहेत. त्यातून एका कर्षात तब्बल अडीच कोटींचा मुद्देमालदेखील आगीपासून वाचविला. मात्र, 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या काळात दहाजणांचा आगीत मृत्यू झाला असून, सातजण जखमी झाले आहेत.

मागील आर्थिक वर्षात विशेषत: जानेकारी ते मार्च या काळात एमआयडीसी परिसरातील उद्योगांमध्ये आगीच्या घटना वाढल्या होत्या. त्यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सुभाष देशमुख यांनी हा मुद्दा उचलून धरला. त्यानुसार, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने महापालिकेशी पत्रव्यवहार करून तीन जागा सुचविल्या होत्या. त्या जागांची पाहणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली आणि पाण्याच्या टाकीजवळील जागा निश्चित केली. त्यासंबंधीची माहिती महापालिकेने एमआयडीसीला कळविली असून, आता त्याचा कृती आराखडा तयार करायला सुरुवात झाली आहे. त्यासाठी लागणारा निधी आता महापालिका किंवा जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध केला जाणार आहे.

एमआयडीसीतील उद्योगांचे आगीपासून संरक्षण व्हावे म्हणून पाण्याच्या टाकीजवळ स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभारले जाणार आहे. जागा अंतिम झाली असून, जवळील पंपहाऊसमधूनच पाणी घेता येईल. तेथे कायमस्वरूपी दोन गाडय़ा असणार आहेत.

– केदार आवटे, अग्निशमन विभागप्रमुख, सोलापूर महापालिका.