अर्जावर चुकीचे नाव लिहिले तरी परीक्षेला बसू देण्याची परवानगी, हायकोर्टाने दिले आदेश; नोकर भरतीच्या उमेदवाराला दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नोकर भरती परीक्षेचा ऑनलाइन अर्ज भरताना नाव लिहिताना चूक झालेल्या उमेदवाराला उच्च न्यायालयाने दिलासा दिला. या उमेदवाराला परीक्षेला बसू द्यावे, असे आदेशच न्यायालयाने सोलापूर महापालिकेला दिले.

अंशुमन जितेंद्र बडगुजर असे या उमेदवाराचे नाव आहे. अंशुमन हे नाव सर्व कागदपत्रांवर आहे. सोलापूर पालिकेतील नोकर भरतीचा अर्ज भरताना चुकीचे नाव लिहिले गेले. परीक्षेच्या ओळखपत्रावर चुकीचे नाव छापून आले. अर्ज भरताना चुकीचे नाव लिहिले गेले म्हणून परीक्षेला बसू न देण्याची शिक्षा अंशुमनला देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. अंशुमनला चुकीचे नाव असलेल्या ओळखपत्रावरच परीक्षेला बसू द्यावे, असे आदेश न्यायालयाने सोलापूर पालिकेला दिले. त्यानुसार त्याने परीक्षादेखील दिली.

काय आहे प्रकरण
गेल्या वर्षी सोलापूर पालिकेने नोकर भरतीची जाहिरात दिली. पालिकेने ऑनलाइन अर्ज मागवले. त्यानुसार अंशुमनने कनिष्ठ अभियंता पदासाठी अर्ज भरला. हा अर्ज भरताना अंशुमनने त्याचे नाव चुकीचे लिहिले. त्यानंतर त्याला परीक्षेचे ओळखपत्र मिळाले. ओळखपत्रावर चुकीचे नाव छापून आले होते. त्याने तत्काळ पालिकेशी ऑनलाइन संपर्क साधला. एकदा अर्ज भरल्यानंतर त्यात बदल करता येत नाही, असे प्रशासनाने त्याला सांगितले. अर्जावर योग्य नाव लिहिण्याची परवानगी द्यावी व परीक्षेला बसू द्यावे, अशी मागणी करत अंशुमनने अॅड. डॉ. उदय वारुंजीकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली. ही याचिका न्यायालयाने मंजूर केली.

अॅड. वारुंजीकर यांचा युक्तिवाद
अंशुमनकडून टायपिंग मिस्टेक झाली आहे. ही चूक सुधारता येणार नाही, असे पालिकेने सांगितले आहे. चुकीचे नाव असलेल्या ओळपत्रावर त्याला परीक्षेला बसू न देण्याची भीती आहे. तेव्हा अंशुमनला परीक्षेला बसू देण्याचा आदेश द्यावेत, अशी मागणी अॅड. वारुंजीकर यांनी केली. ती न्यायालयाने मान्य केली.