
जिल्ह्यात जानेकारी ते जुलै या सहा महिन्यांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकूण 16 कारवाया करण्यात आल्या आहेत. यात पाच कारवाया पोलीस खात्याबाबत झाल्या असून, सहा पोलिसांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष लाच घेताना अटक करून गुन्हा दाखल केल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संजीव पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, आवडेवारीनुसार सोलापूर जिल्ह्यात लाचखोरीत पोलीस खाते अव्वल असल्याचे दिसून येत आहे.
गडचिरोलीहून बदली होऊन आलेले पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यामुळे सोलापूर शहर पोलीस खाते शिस्तबद्धपणे काम करत आहे. कामात कुचराई करणाऱ्य़ा अनेक पोलीस कर्मचारी व अधिकाऱयांच्या पोलीस मुख्यालयात बदल्या करण्यात आल्या आहेत. कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार होऊ नये, यासाठी पोलीस आयुक्तांनी अनेक उपाययोजना केल्या. दुसरीकडे ग्रामीण पोलीस दलात पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जबाबदारी स्विकारल्यापासून भ्रष्टाचार करणाऱयांचे धाबे दणाणले होते. इतके कडक आणि शिस्तप्रिय अधिकारी असूनही सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक यांच्या यादीत पोलीस खात्याचे नाव अव्वल आले आहे. जानेवारीपासून जुलै 2021 पर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोलापुरात एकूण 16 कारवाया केल्या आहेत. त्यामध्ये 5 कारवाया एकट्या पोलीस खात्याच्या आहेत. यात सहा पोलिसांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर न्यायालयात सुनावणीही सुरू आहे.
पहिल्यांदाच महिला पोलीस निरीक्षकाकडे पदभार
सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि सहायक पोलीस निरीक्षक यांना लाच घेताना अटक झाली होती.पण, सलगर वस्ती पोलीस ठाण्याचा पदभार कोणाकडे देणार, याची उत्सुकता लागली होती. शनिवारी (दि. 10 जुलै) रात्री अश्विनी भोसले या महिला पोलीस अधिकाऱ्य़ाची सलगर वस्ती पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली. सोलापुरात सध्या सात पोलीस ठाणी आहेत. आजतागायत या सातही पोलीस ठाण्यांच्या पोलीस निरीक्षकपदी महिला अधिकाऱयांची नियुक्ती झाली नव्हती. पोलीस आयुक्तालय 1992 साली स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच महिला पोलीस निरीक्षकाला पोलीस ठाण्याचा चार्ज देण्यात आला आहे.
शुक्रवारी अटक; शनिवारी निलंबित
मुरुम उपसाप्रकरणात आरोपीला मदत करतो म्हणून तब्बल साडेसात लाखांची लाच मागणाऱ्य़ा सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे करिष्ठ पोलीस निरीक्षक संपत पवार व सहायक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे या दोघांना जुना पुना नाका येथे शुक्रवारी (दि. 9) अटक करण्यात आली होती. शनिवारीच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दोघांना निलंबित केल्याचे आदेश पारित केले आहेत.




























































