
समाजाचे, नागरिकांचे, राज्याचे रक्षक असलेल्या पोलिसांच्या पाठीशी हे सरकार असल्याचे वेळोवेळी दाखवून दिले आहे. पोलिसांना राहण्यासाठी घरे, पोलीस ठाणे, सुविधा या प्रत्येक बाबतीत आपल्या सरकारने केवळ विचार न करता सकारात्मक कृती केली आहे. काही जणांना चांगली कामे पाहवत नाहीत, म्हणूनच ते पोलिसांना माफिया वगैरे म्हणत त्यांची बदनामी करतात. असे मत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. शनिवारी पोलिसांच्या 112 हेल्पलाईन आणि CCPWC प्रणालीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले कि आजपासून कोरोनाचे निर्बंध उठवले. मास्कसक्ती उठवली असली तरी सर्वांनी मास्क घालणे आरोग्यासाठी अपरिहार्य आहे. निर्बंध असले की पोलीस रस्त्यावर असतात आणि निर्बंध उठले तरी नेहमीच्या कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना आपले काम करावेच लागते. त्यांना नेहमीच सज्ज राहावे लागते. प्रसंगी आपल्या कुटुंबीयांकडे देखील त्यांना लक्ष देता येत नाही.
पोलिसच आपले रक्षक असल्याचे अनेक जण विसरून जातात. पण मला अगदी लहानपणापासूनच पोलिसांचा अभिमान आहे. पूर्वीच्या पोलिसांचा युनिफॉर्म वेगळा होता. त्यावेळी हाफ पॅण्ट असलेला निळा गणवेश आणि हातात दंडुका घेतलेल्या पोलिसाला आपण पाहायचो. आता काळ बदलला आहे, नवीन हत्यारे उपकरणे आली आहेत. त्यामुळे गुन्हेगाराच्या एक पाऊल पुढे जाऊन पोलिसांना विचार करण्याची गरज भासू लागली आहे.
पोलीसाचा धाक व दरारा वाटेल असे त्यांचे व्यक्तिमत्व असायलाच हवे. आपण अजूनही कसाबला विसरलेलो नाही. कोणाच्या ध्यानीमनी नसताना अतिरेकी किती विचारपूर्वक आणि शस्त्रसज्ज होऊन मुंबईत घुसले. पण तुकाराम ओंबाळे सारख्या शूर पोलीस हवालदाराने जीवाचे बलिदान दिले पण त्यापूर्वी त्या अतिरेक्याला रोखले.
सरकारतर्फे पोलिसांना सर्व सोयी सुविधा देण्यात येणार आहेत, ते आपले कर्तव्यच आहे. पण पोलिसांमध्ये गुन्हेगारांशी लढण्याची जिद्द सुद्धा पाहिजे आणि ती जिद्द आपल्यात निश्चितपणे आहे. आपण पोलिसांना केवळ सुविधा देण्याच्या घोषणा करीत नसून तीन ते साडे तीन हजार दुचाकी आणि चारचाकी अद्ययावत वाहने उपलब्ध करून दिली आहेत.
पोलिसांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी सर्व गोष्टींचे आधुनिकीकरण करणे देखील सुरू आहे. जनतेच्या मनात विश्वास निर्माण व्हायला हवा कि मी एकटा नाही तर प्रत्येक पावलावर पोलीस माझ्या मदतीला आहे. 112 नंबर फिरवला की गुन्हेगारांचे बारा वाजलेच पाहिजे.
ज्या प्रमाणे दोन वर्षे आपण कोरोनाच्या न दिसणाऱ्या विषाणूचा मुकाबला केला तसाच आता सायबर क्राइमचा व्हायरस देखील मोठा होतोय, त्याचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा उभारावी लागणार आहे. मला खात्री आहे, याचा देखील आपण मुकाबला करून गुन्हेगारांना शिक्षा घडविली जाईल. सरकार पावलोपावली पोलिसांच्या सोबत आहे. जागतिक दर्जाचे पोलीस होण्यासाठी व प्रगती व्हावी म्हणून सरकार नेहमी तुमच्या बरोबर राहील.
सैन्यातील जवानांप्रमाणे पोलिसांची शरीरयष्टी असावी – अजित पवार
या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते ते म्हणाले कि काही पोलिसांची शरीर प्रकृती इतकी कमकुवत असते कि त्यांच्याकडे पाहताच प्रश्न पडतो कि उद्या यांच्या अंगावर दोघेजण धावून आले तर ते त्याचा प्रतिकार कसा करणार. तर काही अधिकारी व पोलिसांचे पोट इतके सुटलेले असते कि ते गुन्हेगारांचा पाठलाग कसा करणार असा प्रश्न पडतो. त्यामुळे पोलिसांना उंची व वजनाची अट यापुढं असायला हवी. तसेत सैन्यात असणाऱ्या जवानांप्रमाणे पोलिसांची शरीरयष्टी असावी असे मत अजित पवारांनी व्यक्त केले.
























































