आपलीच काही लोकं पाकिस्तानची मदत करताहेत, मोदींचा गौप्यस्फोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कानपूर

पुलवामा हल्ल्यानंतर हिंदुस्थानी वायुसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या एअर स्ट्राईकवरून राजकारण सुरू आहे. विरोधकांकडून हवाई हल्ल्याचे पुरावे मागितले जात आहेत. शुक्रवारी कानपूरमध्ये एका सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या या राजकारणावर सडकून टिका केली. एकीकडे जवानांच्या शौर्याने आमची छाती अभिमानाने फुगली आहे तर दुसरीकडे आपल्या घरातीलच काही लोक अशी आहेत ज्यांच्या वक्तव्याचा फायदा दहशतवाद्यांना पोसणारे घेत आहेत.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, पाकिस्तानला यावेळी रंगेहाथ पकडण्यात आले आहे. हिंदुस्थानला जगभरातील पाठिंब्यामुळे पाकिस्तान दबावात आहे. आज पाकिस्तानला जगभरात तोंड दाखवायला जागा राहिलेली नाही. परंतु आपल्याच देशात काही अशा व्यक्ती आहेत ज्यांच्या वक्तव्यामुळे भ्रम पसरला जात आहे आणि याचा पाकिस्तान फायदा उचलत आहे. तसेच मोदी पुढे म्हणाले की, देशातील सव्वाशे कोटी जनतेची ताकद एकत्र आली तर दहशतवादाचा बिमोड केला जाऊ शकतो. जनतेची ताकद आपल्यासोबत असल्यामुळेत दहशतवादाविरोधात कठोर पाऊलं उचलू शकलो, असेही मोदी यावेळी म्हणाले.

modi-kanpur

विरोधकांवर हल्लाबोल
कानपूरमध्ये विविध योजनांची सुरुवात केल्यानतंर मोदींनी विरोधकांवर हल्ला चढवला. पुलवामा हल्ल्यानंतर हिंदुस्थानच्या जवानांनी पाकिस्तानमध्ये घुसून जे शौर्य दाखवले याचा आम्हाला अभिमान आहे. परंतु काही लोक यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून जवानांच्या शौर्याचा अपमान करत आहेत. अशा लोकांना लाज वाटायला हवी, अशा शब्दात मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. तसेच येथील काही लोकं पाकिस्तानला चांगलं वाटायला हवं म्हणून लष्कराच्या शौर्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. आपल्याच घरातील काही लोकं दहशतवाद्याना पोसणाऱ्यांची साथ देत आहेत, असाही गंभीर आरोप मोदींनी यावेळी केला.

मोदी पुढे म्हणाले निवडणुका येतील आणि जातील परंतु याचा फायदा शत्रू राष्ट्राला होऊ न देणे याची जबाबदारी आपली असल्याचे ते म्हणाले. तसेच ही जबाबदारी फक्त लष्कराची आहे का? प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक नेत्याची ही जबाबदारी नाही का? मोदीविरोधासाठी दहशतवाद्यांना फायदा पोहोचवणे योग्य आहे का? असा सवाल मोदींनी यावेळी उपस्थित केला. तसेच आम्ही दहशतवादाला उखडून फेकू असे आश्वासन यावेळी मोदींनी जनतेला दिले.