
सामना ऑनलाईन । लखनौ
उत्तर प्रदेशाच्या बस्ती जिल्ह्यात हाकेला ओ दिले नाही म्हणून वडिलांनी मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये त्या नराधम पित्यास अटक करण्यात आली आहे. राकेश असं त्या पित्याचे नाव असून मुलाचं नाव राहुल आहे.
पारसरामपूर येथे राहणाऱ्या राकेशच्या पत्नीचे निधन झाले होते. तिच्यापासून त्याला राहुल व राजन ही मुलं होती. नीतुच्या निधनानंतर राकेशने अर्चना या महिलेबरोबर दुसरे लग्न केलं. पण अर्चनाचे मुलांबरोबर पटत नव्हते. सोमवारी राकेशने कामानिमित्त राहुलला हाक मारली. पण मोबाईल गेम खेळत असलेल्या राहुलने त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे चिडलेल्या राकेशने त्याला मारहाण केली. यावेळी त्याने राहुलच्या छातीवरच लाथ मारली. पण ती वर्मी बसल्याने राहुलला रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला. राहुलचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच राकेशने त्याचा मृतदेह जंगलात जाऊन पुरला. संध्याकाळी राजन घरी आल्यावर त्याला राहुल कुठेही दिसला नाही. यामुळे त्याने वडिलांना याबद्दल विचारले. पण राकेशने त्याला उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे राजनने आजोबांना फोन करुन याबद्दल सांगितले. राकेशचा स्वभाव माहित असल्याने आजोबांना त्याच्यावर संशय आला. यामुळे त्यांनी तात्काळ पोलिसांना राहुल बेपत्ता असल्याचे सांगितले.
दरम्यान, गावातील काहीजणांना जंगलात एका मुलाचा अर्धवट पुरलेला मृतदेह दिसला. त्यानंतर त्यांनी याबदद्ल पोलिसांना कळवले. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. तेव्हा तो राहुल असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमार्टमला पाठवला. शवविच्छेदन अहवालात मेंदूतून होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे राहुलचा मृत्यू झाल्याचे समोर आले. जेव्हा पोलिसांनी राकेशला याबद्दल जाब विचारला. तेव्हा घाबरलेल्या राकेशने गुन्ह्याची कबुली दिली.





























































