
न्यूझीलंड दौऱयामध्ये वन डे मालिकेत सपाटून मार खाणारा हिंदुस्थानचा क्रिकेट संघ 12 मार्चपासून सुरू होणाऱया दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी सज्ज झालाय. सीनियर निवड समितीचे नवे चेअरमन सुनील जोशी यांच्या उपस्थितीत या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. याप्रसंगी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांडय़ा, मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वरकुमार व सलामीवीर शिखर धवनचे संघात कमबॅक झाले आहे.
केदार जाधव बाहेर
महाराष्ट्राचा खेळाडू केदार जाधव याला संघात संधी देण्यात आलेली नाही. गेल्या काही सामन्यांमध्ये त्याला चमकदार खेळ करता आलेला नाही. पुढचा वन डे वर्ल्ड कप 2023 सालामध्ये खेळवण्यात येणार आहे. तोपर्यंत त्याचे वय 38 असेल. त्यामुळे त्याला यापुढे टीम इंडियात संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. शुभमन गिलला या मालिकेत संधी देण्यात आली आहे.
शार्दूल, शिवम हे मुंबईकरही आऊट
हार्दिक पांडय़ा व भुवनेश्वरकुमार या अष्टपैलू खेळाडूंचे संघात पुनरागमन झाल्यामुळे टी-20 मालिकेत चांगली कामगिरी करणारा शार्दूल ठाकूर व वारंवार संधी मिळूनही अपयशी ठरणारा शिवम् दुबे यांना संघाबाहेर राहावे लागले आहे. हे दोन्ही खेळाडू मुंबईचेच. युवा सलामीवीर मयांक अग्रवाललाही आणखी एक संधी देण्यात आलेली नाही.
रिषभ पंत कायम
यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंतवर पुन्हा एकदा विश्वास दाखवण्यात आला आहे. तसेच रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल या खेळाडूंवर फिरकीची मदार असणार आहे. श्रेयस अय्यर, मनीष पांडे हे मधल्या फळीत खेळतील. जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी यांना तेज गोलंदाजीची धुरा सांभाळावी लागेल.
रोहित, शमीला विश्रांती
रोहित शर्मा व मोहम्मद शमी या दोघांनाही दुखापत झाली असून दोघांचीही या संघात निवड करण्यात आलेली नाही. दोघांनाही विश्रांती देण्यात आलेली आहे. मुंबईकर पृथ्वी शॉला संघात कायम ठेवण्यात आले असून शिखर धवन, लोकेश राहुल व पृथ्वी शॉ या तीन सलामीवीरांची संघामध्ये निवड करण्यात आली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी हिंदुस्थानचा चमू
शिखर धवन, पृथ्वी शॉ, विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पांडय़ा, रवींद्र जाडेजा, भुवनेश्वरकुमार, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, कुलदीप यादव, शुभमन गिल.
मालिका खालीलप्रमाणे
पहिली वन डे – 12 मार्च, धर्मशाळा
दुसरी वन डे – 15 मार्च, लखनौ
तिसरी वन डे – 18 मार्च, कोलकाता


























































