आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजाला इंग्लंडमध्ये बेदम मारहाण, दोन शस्त्रक्रियांनंतरही प्रकृती चिंताजनक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिण आफ्रिकेचे अंडर-19 संघाचे प्रतिनिधीत्व केलेल्या वेगवान गोलंदाज मोंडली खुमालो याला इंग्लंडमधील पबबाहेर बेदम मारहाण करण्यात आली आहे. त्याच्या दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून त्यानंतरही त्याची प्रकृती चिंताजनक आहे. ‘ईएसपीएन क्रिकइन्फो’ने याबाबत वृत्त दिले आहे.

मोंडली खुमालो हा सध्या नॉर्थ पेथरनट क्रिकेट क्लबकडून खेळत असून या क्लबसोबत तो आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यासाठी इंग्लंडमध्ये गेला होता. या दौऱ्यात मिळवलेल्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी तो ब्रिजवॉटर शहरातील एका पबमध्ये गेला होता. येथे त्याला बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर मोंडली खुमालो घटनास्थळी बेशुद्धावस्थेत पडला होता. यानंतर त्याला साऊथमेड रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले.

मोंडली खुमालो याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून घटनास्थळी रक्ताचा डोह साचला होता. आतापर्यंत त्याच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. डॉक्टरांनी त्याला औषधे देऊन कृत्रिमरित्या कोमामध्ये ठेवले आहे. मोंडली खुमालो याची प्रकृती चिंताजनक असून या प्रकरणी एका 27 वर्षीय व्यक्तीला अटकही करण्यात आली आहे.

नॉर्थ पिथरटन क्रिकेट क्लब आणि मोंडली खुमालोचा एचंट रॉब हम्फ्रीज याने याबाबत माहिती देताना सांगितले की, त्याच्या कुटुंबियांना या घटनेबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यांना लवकरात लवकर पासपोर्ट मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच मोंडली खुमालो याचा स्वभाव चांगला होता, असे असतानाही त्याच्यावर हा हल्ला का झाला हे समजणे आकलनापलीकडचे आहे, असेही तो म्हणाला.

मोंडली खुमालो याने 2020 मध्ये झालेल्या अंडर-19 वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधीत्व केले होते. त्याने प्रथम श्रेणीचे चार सामनेही खेळले आहेत.