खेडा खरेदी व्यापाऱ्यांकडून सोयाबीन उत्पादकांची फसवणूक, बाजार समितीत शेतकऱ्यांनी माल विकण्याचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खेडा खरेदीच्या माध्यमातून शेतकऱयांना वजनात लुटण्यासोबतच बाजार समितीचा सेस व शासनाचा महसूल बुडविण्याच्या घटना मोठय़ा प्रमाणावर कोपरगाव तालुक्यात घडत आहेत. खेडा खरेदी व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी व सोयाबीनला योग्य भाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला शेतमाल बाजार समितीच्या आवारातच विक्रीस आणावा, असे आवाहन कोपरगाव बाजार समितीकडून करण्यात आले आहे.

यावर्षी तालुक्यात कमी पावसामुळे शेतकऱयांची सोयाबीन, मका या पिकांची मोठी हानी झाली असून, उत्पन्नात घट झाल्याचे दिसून येत आहे. सोयाबीन, मका या पिकांची काढणी सुरू असल्याने मजुरांना देण्यासाठी व रब्बी पिके उभी करण्यासाठी शेतकऱयांना पैशाची गरज आहे. शेतकऱ्यांच्या या अडचणींचा फायदा घेऊन बाजार समिती ऐवजीखेडा खरेदीच्या माध्यमातून व्यापारी सोयाबीनची उचल करीत आहेत. त्यामुळे बाजार समितीचा व शासनाचा महसूल बुडत असल्याने बाजार समिती व्यवस्थापनाने या विरोधात कारवाईचा निर्णय घेतला.

कोणताही परवाना नसताना, बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात सोयाबीनची खरेदी करणाऱया व्यापाऱयाकडून खेडा खरेदीत शेतकऱयांची फसवणूक होण्याची शक्यतादेखील अधिक राहते. शेतकऱयांच्या शेतमालाला जादा भाव देण्याचे आमिष दाखवून शेतकऱयांच्या आर्थिक अडचणींचा फायदा घेऊन आर्द्रता मशिनमध्ये हातचलाखी करून वाळलेली सोयाबीन, मका यांची आर्द्रता जास्त व प्रतवारी कमी असल्याचे भासवून शेतकऱयांची फसवणूक करत आहेत, असे बाजार समितीच्या निदर्शनास येत असून, बाजार समितीने अशा व्यापाऱयांवर कारवाई करण्यासाठी बाजार समितीने पथक नियुक्त केले आहे.

शेतकरी बांधवांनी शेतमाल विकत असताना व्यापाऱयांकडून हिशेबपट्टीची प्रत घ्यावी, त्यामुळे शेतकऱयांना भविष्यात शासनाकडून अनुदान योजनेचा फायदा घेता येईल, या दृष्टीने कोपरगाव बाजार समितीच्या आवारात भुसार, सोयाबीन विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशुर यांनी केले आहे.

कोपरगाव तालुक्यातील शेतकरी बांधवांनी बाजार समितीचे परवानाधारक सोयाबीन खरेदीदार यांनाच आपला शेतमाल विक्री करून बाजार समितीस सहकार्य करावे जेणेकरून कोणत्याही शेतकऱयाची फसवणूक होणार नाही.
– साहेबराव रोहोम, सभापती, कोपरगाव बाजार समिती.

बाजार समितीमध्ये उघड लिलाव बोलीने सर्व धान्याचे लिलाव होत असल्यामुळे शेतकऱयांच्या शेतमालाला चांगला भाव मिळतो. बाजार समितीमध्ये हमाली व तोलाई वगळता शेतकऱयांच्या काटा पट्टीत कुठलीही कपात केली जात नाही. या व्यतिरिक्त त्यांना पैशाची हमी आहे.
– गोवर्धन परजणे, उपसभापती, कोपरगांव.