
मुंबई विमानतळाच्या इंटरनॅशनलवरून डोमेस्टिक विमानतळावर कनेक्टिंग फ्लाईट पकडण्यासाठी आता धावपळ करण्याची आवश्यकता नाही. कनेक्टिंग फ्लाईटदरम्यान प्रवाशांना येणाऱया अडचणी दूर करण्यासाठी विमानतळ प्रशासनाने विशेष यंत्रणा विकसित केली असून, देशातील हा पहिलाच प्रयोग आहे. टर्मिनल दोनवर देशांतर्गत मार्गांसाठी ही यंत्रणा तयार केली आहे.
याआधी मुंबई विमानतळावरून कनेक्टिंग फ्लाईट पकडणाऱया प्रवाशांना विमानतळाबाहेर पडल्यानंतर पुन्हा मुख्य प्रवेशद्वारापाशी येऊन सर्व प्रक्रिया नव्याने करावी लागत होती. त्यामुळे गर्दी वाढून बोर्डिंग पास इतर तपासणीकरिता वेळ लागत असे. अशात एखाद्याच्या ‘कनेक्टिंग फ्लाईट’मधील वेळ अवघ्या काही मिनिटांचा असला तर त्या प्रवाशाला बरीच धावपळ करावी लागे. इतके करूनही बोर्डिंग कालवधीपर्यंत पोहोचता येईल याचीही शाश्वती नसायची. प्रवाशांची ही ओढाताण लक्षात घेऊन ‘कनेक्टिंग फ्लाईट’ पकडणाऱयांसाठी विशेष व्यवस्था तयार करण्यात आली आहे. अशा कनेक्टिंग फ्लाईट असणाऱयांना विमानतळाबाहेर पडू न देता, वेगळ्या रांगेतून आत घेतले जाईल. यासाठी सीआयएसएफ जवानांची मदत घेतली जाणार आहे. या प्रवाशांसाठी वेगळ्या चेक-इन काऊंटरची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मुंबई विमानतळ प्रशासनाने दिली.


























































