
हवाई प्रवास करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, त्याचे तिकीट आणि इतर बाबींची माहिती नसल्याने किंवा आर्थिक अडचणींमुळे अनेकांना हे स्वप्न पूर्ण करता येत नाही. त्यांच्यासाठी एका हवाई कंपनीने ईएमआयवर हवाई प्रवास करण्याची सुविधा दिली आहे. हवाई प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी ही सेवा देण्यात येत असल्याचे कंपनीने सांगितले.
देशातील हवाई प्रवास वाढवण्यााठी स्पाईसजेटने अनोखी सुविधा सुरू केली आहे. स्पाईसजेट तिकीटावर कोणतेही व्याज न आकारता ईएमआयवर ( नो कॉस्ट ईएमआय) हवाई सेवा देणार आहे. या सुविधेद्वारे हवाई प्रवास करणारे प्रवासी तिकीटांच्या रकमेचा परतावा सुलभ हप्तांमध्ये करू शकणार आहेत. रकमेच्या परताव्यासाठी प्रवाशांना तीन, सहा आणि बारा हप्त्यांच्या पर्याय देण्यात आला आहे.
या सुविधेच्या सुरुवातीच्या काळात प्रवासी कोणत्याही अतिरिक्त रकमेशिवाय या सेवेचा फायदा घेऊ शकणार आहेत. सुरुवातीच्या तीन महिन्यांपर्यंत अतिरिक्त रकमेशिवाय ही सेवा देण्यात येणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना पॅन कार्ड, आधाक कार्ड, व्हीआयडी यासारखी आवश्यक माहिती द्यावी लागेल. त्यानंतर एका पासवर्डद्वारे ती माहिती सत्यापित करावी लागेल.
प्रवाशांनी आपल्या युपीआय आयडीद्वारे पहिला हप्ता भरावा लागेल. त्यानंतर पुढील ईएमआय प्रवाशांच्या युपीआय आयडीमधून कापले जाणार आहेत. त्यासाठी प्रवाशांना त्यांना क्रेडिट किंवा डेबिट कार्डची माहिती द्यावी लागणार नाही. ईएमआयची रक्कम प्रवाशांनी दिलेल्या पर्यायानुसार कापली जाणार आहे.
कोरोना नियंत्रणात आल्यानंतर सरकारने 100 टक्के प्रवासी क्षमतेने हवाई उड्डाणांना परवानगी दिली आहे. त्यामुळे हवाई उड्डाणांच्या क्षेत्राला उभारी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे विविध कंपन्या नवीन उड्डाणे सुरू करत आहेत. स्पाईसजेटने गेल्या महिन्यात 31 ऑक्टोबरपासून 28 नवी देशातंर्गत उड्डाणे सुरू केली आहेत. जयपूर, जैसलमेर, जोधपूर आणि उदयपूर यासह पर्यटकांच्या सोयीसाठी मेट्रो शहरात उड्डाणे सुरू करण्याची घोषणाही कंपनीने केली आहे.



























































