‘जेट’ची जमिनीवरील विमाने स्पाईसजेट उडवणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

‘जेट एअरवेज’ची जमिनीवर उभी असलेली विमाने भाड्याने घेण्यास ‘स्पाईसजेट’ ही विमान कंपनी उत्सुक आहे. सध्या जेटच्या एकूण 119 विमानांपैकी केवळ 41 विमानेच कार्यरत आहेत. उर्वरित विमाने भाड्याने घेण्याची तयारी स्पाईसजेटने दाखविली आहे.

इथियोपिया येथे झालेल्या विमान अपघातानंतर नागरी हवाई वाहतूक प्राधिकरणाने स्पाईसजेटवर 12 बोईंग 737 मॅक्स 8 या विमानांच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. त्यामुळे स्पाईसजेटला विमानांची कमतरता भासत असून याचा परिणाम विमान प्रवास भाडय़ावरही झाला आहे. जेटची विमाने स्पाईसजेटला भाडय़ाने मिळाल्यास फ्लाईट्सची कमतरता भरून काढण्यास मदत होणार आहे.

12 बोईंग 737 मॅक्स 8 वर बंदी आल्याने दिल्ली मुंबई फ्लाईटस्च्या तिकिटाचे दर अवघ्या काही तासांतच 20 टक्क्यांनी वाढले. स्पाईसजेटला जेट एअरवेजची विमाने भाडय़ाने मिळाल्यास फ्लाईटस्ची कमतरता भरून निघण्यास मदत होणार आहे.

‘डील’ झाल्यास विमानांची रंगरंगोटी
जेट एअरवेज आणि स्पाईसजेटमध्ये विमाने भाडय़ाने घेण्याची डील झाल्यास सर्वात आधी जेट एअरवेजच्या विमानांची रंगरंगोटी करण्यात येईल. जेटच्या विमानांचे स्पाईसजेटच्या विमानात रूपांतर करण्यात येईल. त्यासाठी काही आठवडय़ांचा अवधी लागणार आहे.