
राष्ट्रकुल स्पर्धेतील महिला हॉकीत ‘करो या मरो’ लढतीत हिंदुस्थानी महिलांनी आज कॅनडावर 3-2 असा चुरशीचा विजय मिळवत उपांत्य फेरीत मजल मारली. आरंभाला 2-0 अशी आघाडी घेणाऱ्या हिंदुस्थानला नंतरच्या सत्रात मात्र आपल्या आक्रमणाची धार कायम राखता आली नाही. त्यामुळे 15 वे रँकिंग असणाऱ्या कॅनडाच्या फॉर्वर्डस्नी हिंदुस्थानी गोलक्षेत्रात मुसंडी मारत 2-2 अशी बरोबरी साधली होती, पण 51व्या मिनिटाला लालरेमसियामी हिने पेनल्टी कॉर्नरवरील रिबॉऊंड चेंडूवर शानदार गोल नोंदवत हिंदुस्थानला विजयी केले.
पहिल्या सत्रात सलिमा टेटेने 3ऱ्या मिनिटाला तर नवनीत कौरने 22व्या मिनिटाला अप्रतिम गोल नोंदवत हिंदुस्थानला 2-0 अशी शानदार आघाडी मिळवून दिली होती, पण नंतर मात्र कॅनडाच्या फॉर्वर्डस्नी जोरदार प्रतिहल्ले चढवत 2 गोल नोंदवले. कॅनडाच्या वतीने ब्रीएने स्टिअर्स हिने 23व्या मिनिटाला तर हाना हॉगनने 39व्या मिनिटाला गोल नोंदवत कॅनडाला 2-2 अशी बरोबरी मिळवून दिली होती.






























































