दहावीच्या इतिहास-राज्यशास्त्राचा पेपरफुटी प्रकरणी क्लासचालकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई/भिवंडी

दहावीच्या पेपरफुटीच्या घटना रोखण्यासाठी हायटेक उपाययोजना करूनही शिक्षण मंडळाला अपयश आले आहे. बुधवारी होळीच्या दिवशी सामाजिक शास्त्र – 1 (इतिहास-राज्यशास्त्र)ची प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वी अर्धा तास आधीच व्हॉटस्ऍपवर व्हायरल झाली. भिवंडी येथील पी. डी. टावरे विद्यालय परीक्षा केंद्रात ही पेपरफुटीची घटना घडली असून याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावी परीक्षेचा ‘शिमगा’ सुरूच आहे. विज्ञान-1, विज्ञान-2 पाठोपाठ बुधवारी सामाजिक शास्त्राची प्रश्नपत्रिकाही परीक्षेआधीच व्हॉटस्ऍपवर व्हायरल झाली. भिवंडीतील काल्हेर येथील पी. डी. टावरे विद्यालय या परीक्षा केंद्रात गेल्या तीन-चार दिवसांपासून काही विद्यार्थी परीक्षा सुरू झाल्यावर ठरावीक वेळेनंतर परीक्षागृहात प्रवेश करतात. ही बाब येथील विद्या पाटील या शिक्षिकेच्या निदर्शनास आली. बुधवारीदेखील परीक्षा सुरू झाली तरी काही विद्यार्थी परीक्षा केंद्राच्या बाहेरच होते. त्यामुळे पाटील यांनी या विद्यार्थ्यांना हटकले. त्याच वेळी तीन विद्यार्थिनी एका रिक्षात बसून मोबाईलवर काही पाहत असल्याचे पाटील यांच्या निदर्शनास आले. त्यांनी या विद्यार्थिनींचे मोबाईल ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यांना सामाजिक शास्त्र-1 च्या प्रश्नपत्रिकेचे स्क्रीनशॉट व्हॉटस्ऍपवर दिसले. हे स्क्रीनशॉट साडेदहा ते साडेअकराच्या दरम्यान व्हॉटस्ऍपवर आले आहेत.

याप्रकरणी परीक्षा केंद्रप्रमुख मुख्याध्यापक गणेश भोईर यांनी नारपोली पोलीस ठाण्यात या किरोधात तक्रार दाखल केली. तसेच 18 मार्च रोजी पार पडलेल्या विज्ञान पेपर-2ची प्रश्नपत्रिका केईएमएस स्कूल या परीक्षा केंद्रावरून व्हॉटस्ऍपवर व्हायरल झाल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे, शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास शेंडगे यापक्ररणी अधिक तपास करीत आहेत.

टय़ूशन क्लासचालकाला अटक

व्हॉटस्ऍपवरील पेपरफुटीप्रकरणी शहर पोलिसांनी शेख वजीर हफिजुल रेहमान या टय़ूशन क्लासचालकाला अटक केली आहे. हा उर्दू विषयाचा शिक्षक असून त्याला न्यायालयात हजर केले. त्याला 26 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

व्हॉटस्ऍपवर अशी मिळाली प्रश्नपत्रिका

  • ज्या विद्यार्थिनींच्या व्हॉटस्ऍपवर प्रश्नपत्रिका सापडली त्या भिवंडीतील एका कॉन्व्हेंट स्कूलच्या विद्यार्थिनी आहेत.
  • चारच दिवसांपूर्वी या विद्यार्थिनींनी व्हॉटस्ऍपवर ‘टॉपर्स ग्रुप’ नावाने ग्रुप तयार केला होता.
  • या ग्रुपमध्ये चार विद्यार्थिनीच होत्या. या ग्रुपवरच त्यांना इतिहास-राज्यशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेचे स्क्रीनशॉट ‘फॉरवर्ड’ झाले आहेत.
  • प्रश्नपत्रिकेचे स्क्रीनशॉट त्यांना कसे मिळाले, कुणी पाठवले याविषयी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याप्रकरणी भिवंडी पोलीस अधिक तपास करीत आहेत. या प्रकरणाच्या सखोल चौकशीअंती दोषींवर कायदेशीर कारवाई होईलच शिवाय शिक्षण मंडळही दोषींविरोधात कडक पावले उचलेल- शरद खंडागळे, सचिव, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक, मुंबई विभागीय शिक्षण मंडळ

येथे पेपरफुटी

  • 15 मार्च – विज्ञान पेपर 1 – पी. डी. टावरे विद्यालय, भिवंडी
  • 18 मार्च – विज्ञान पेपर 2 – केईएमएस स्कूल, भिवंडी
  • 20 मार्च – सामाजिक शास्त्र 1 – पी. डी. टावरे विद्यालय, भिवंडी