
सामना ऑनलाईन । मुंबई
मार्च 2019 मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेपासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन हॉल तिकीट मिळणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाइटवर उद्या बुधवारपासून शाळांना हॉल तिकीट डाऊनलोड करता येणार आहे.
www.mahasscboard.in किंवा www.mahasscboard. maharashtra.gov.in या वेबसाइटवर जाऊन स्कूल लॉग इनमधून हॉल तिकीट डाऊनलोड करता येईल. यासंदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास शाळांनी विभागीय शिक्षण मंडळाशी संपर्क साधावा असे आवाहन राज्य शिक्षण मंडळ सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.
हॉल तिकिटावरील विद्यार्थ्याचा फोटो, सही, नाव, जन्मतारीख, जन्मस्थळ यासंदर्भात काही दुरुस्त्या असल्यास शाळांनी स्वतःच्या स्तरावर दुरुस्ती करून त्याची एक प्रिंट विभागीय शिक्षण मंडळाकडे पाठवायची आहे. तसेच विषय आणि माध्यम बदल असतील तर ती दुरुस्ती माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करायची आहे.
हॉल तिकीट हरविल्यास दुसरी प्रत मिळणार
विद्यार्थ्यांकडून हॉल तिकीट हरविल्यास शाळांनी त्या विद्यार्थ्याला हॉल तिकीटची दुसरी प्रिंट काढून द्यायची आहे. या प्रिंटवर लाल शाईने ‘द्वितीय प्रत (डुप्लिकेट)’ असा उल्लेख करायचा आहे. तसेच फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर मुख्याध्यापकांनी शिक्का मारून सही करायची आहे.
- ऑनलाइन पद्धतीने हॉल तिकिटाची प्रिंट देताना शाळांनी विद्यार्थ्यांकडून जादा शुल्क घेऊ नये.
- हॉल तिकिटाच्या प्रिंटवर मुख्याध्यापकांची सही, शिक्का आवश्यक आहे.


























































