
कोरोना संकटामुळे बिकट परिस्थितीत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. मागील तीन महिन्यांच्या थकीत वेतनापैकी ऑगस्ट महिन्याचे वेतन व दिवाळी सणानिमित्त देण्यात येणारा बोनस कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी सोमवारी दिली.
आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल नको
हे तात्पुरते संकट आहे. लवकरच ते दूर होईल. आपल्या कुटुंबावर संकट येऊ देऊ नका. काळ जरी कठीण असला तरी कर्मचाऱयांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे भावनिक आवाहनही परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले.
राज्य सरकारची एसटीला 79 कोटींची मदत
कोरोना संकटामुळे एस. टी महामंडळाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानीतून बाहेर पडण्यासाठी राज्य सरकारने एसटी महामंडळाला मदत जाहीर केली आहे. एसटीला 79 कोटींची मदत तत्काळ जाहीर करण्यात आली असून याविषयीचा शासन आदेशही काढण्यात आला आहे. या मदतीतून कर्मचाऱयांचे थकलेले वेतन आणि देणी देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.






























































