पवारांच्या घरात घुसून जाब विचारू! सदावर्तेंनी केले होते चिथावणीखोर विधान

शुक्रवारी म्हणजेच 08 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाला होता. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी हा हल्ला केला होता आणि या प्रकरणी पोलिसांनी 23 महिलांसह 107 आंदोलकांना अटक केली होती. या कर्मचाऱ्यांची माथी भडकावल्याचा वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आरोप असून त्यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. सदावर्ते यांना शनिवारी न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे. सदावर्ते यांनी आंदोलकांसमोर चिथावणीखोर विधाने केली असल्याचं स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी दाखल केलेल्या प्रथम खबर अहवालात म्हटलंय की सदावर्ते यांनी 07 एप्रिल रोजी प्रसारमाध्यमांना मुलाखत दिली होती. यामध्ये त्यांनी आम्ही शरद पवारांच्या घरात घुसून त्यांना जाब विचारू असं म्हटलं होतं. त्यांनी हे विधान केल्याच्या दुसऱ्याच दिवशी पवारांच्या मुंबईतील निवासस्थानावर हल्ला झाला होता.

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील म्हणून उच्च न्यायालयात उभे राहणारे ऍड. गुणरत्न सदावर्ते शनिवारी गिरगाव कोर्टात आरोपी म्हणून उभे राहणार आहेत. राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर शुक्रवारी दुपारी काही एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केला. हा कट ऍड. सदावर्ते यांनी रचल्याचा आरोप करत पोलिसांनी त्यांना रात्री अटक केली होती.

शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याच्या प्रयत्नानंतर या घटनेबद्दल राज्यभरात तीव्र संताप व्यक्त झाला. या हल्ल्यामागील मास्टरमाइंडला शोधून काढण्याचे आदेश पोलिसांना मिळाले आणि मग तपास वेगाने सरकू लागला. पोलिसांनी 107 आंदोलकांना अटक केली होतीच. त्याचवेळी ऍड. गुणरत्न सदावर्ते हे प्रसारमाध्यमांसमोर आले आणि या घटनेबद्दल आपणास काहीच माहीत नाही असे त्यांनी सांगितले. दुपारी सवा चारपर्यंत मी उच्च न्यायालयात न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्यासमोर एका प्रकरणाच्या सुनावणीत सहभागी होतो, असे सदावर्ते यांनी सांगितले. मात्र त्यानंतर अवघ्या तासाभरातच गावदेवी पोलिसांचे एक पथक त्यांच्या घरी पोहोचले आणि चौकशीसाठी त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन आले.

अटक, जेजे ते गिरगाव

सदावर्ते यांची कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्यांना कट रचणे आणि चिथावणी देणे या गुन्हय़ात अटक केली आणि वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना जेजे रुग्णालयात घेऊन गेले. सदावर्ते यांना आज गिरगाव कोर्टात हजर केले जाणार आहे.

आझाद मैदानातील ‘ते’ पोस्टर

गुरुवारी उच्च न्यायालयाच्या निकालानंतर ऍड. सदावर्ते यांनी कर्मचाऱ्यांसमोर विजयाचे भाषण ठोकले. त्यावेळी तेथे एक पोस्टर लावण्यात आले होते. त्या पोस्टरचे छायाचित्र आजच्या हल्ला प्रकरणानंतर सोशल मींडियावर व्हायरल झाले होते. कारण त्या पोस्टरवरील शेवटची ओळ होती ‘सावधान शरद, सावधान शरद.’

आतापर्यंत नेमके काय झाले

एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. हा संप मिटावा यासाठी न्यायलयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने आवश्यक ते सर्व प्रयत्न केले. कर्मचारी संघटनांसोबतच्या चर्चेत वेतनासह बहुतांशी मागण्या पूर्णही झाल्या.

विलीनीकरणाच्या मागणीसंदर्भात त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली. या समितीने विलीनीकरण शक्य नसल्याचा अहवाल दिला. हा अहवाल स्वीकारत राज्य सरकारने न्यायालय तसेच विधिमंडळाच्या अधिवेशनात सरकारची भूमिका स्पष्ट केली.

यानंतर न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याची नवी मुदत दिली. तसेच कर्मचाऱ्यांवर कारवाई न करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. सोबतच सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांनाही निवृत्तीवेतन, ग्रॅच्युईटी देण्याचे निर्देश न्यायालयाने एसटी महामंडळाला दिले आहेत.

संपकऱ्यांना आझाद मैदानातून हुसकावले

विलीनीकरणाच्या मागणीसाठी मागील पाच महिन्यांपासून आझाद मैदानात आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना मुंबई पोलिसांनी शुक्रवारी रात्री आझाद मैदानातून हुसकावून लावले. तिथून हुसकावून लावल्यानंतर हे कर्मचारी समोरच असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये घुसले होते आणि त्यांनी तिथे ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली होती. आपल्यासोबत असलेल्या 4 ते ५ संपकरी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि नंतर आम्हाला आझाद मैदानातून हुसकावून लावले असा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे.

आंदोलक एस.टी. कर्मचाऱयांचा शरद पवार यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न

विलीनीकरणाच्या मागणीसाठी मागील पाच महिन्यांपासून आझाद मैदानात आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱयांनी आक्रमक होत आज थेट राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ‘सिल्व्हर ओक’ या शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी शे-दीडशे एसटी कर्मचाऱयांनी घोषणाबाजीसह दुपारी जोरदार निदर्शने केली. अचानक हा जमाव घुसल्याने बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांचीही तारांबळ उडाली. दरम्यान, मोठय़ा धैर्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनाला सामोरे जात आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही कर्मचाऱयांचा आक्रमक पवित्रा कायम राहिला. पोलिसांनी याप्रकरणी 24 महिलांसह 103 आंदोलकांना अटक केली आहे. दरम्यान, पवार यांच्या घरावरील हल्लाप्रकरणाबद्दल राज्यभरात प्रचंड संताप व्यक्त होत असून सर्वच स्तरातून तीव्र निषेध होत आहे.

एसटी संपाबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर एसटी कर्मचाऱयांनी गुरुवारी आझाद मैदानात जल्लोष केला, गुलाल उधळत आनंद साजरा केला. न्यायालयाच्या निर्णयानंतर हा संप मिटला असेच वातावरण सर्वत्र होते. त्यामुळे आझाद मैदानातील आंदोलक एसटी कर्मचारी आज परतीच्या वाटेवर निघाले असताना शेकडो कर्मचाऱयांनी अचानक शरद पवार यांच्या निवासस्थानी घुसण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास एसटी कर्मचाऱयांचा एक गट स्कूलबसने ‘सिल्व्हर ओक’ येथे पोहोचला आणि महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.