हजारो एसटी कामगारांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन व्यक्त केली कृतज्ञता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

संपात सहभागी झाल्याने निलंबित करण्यात आलेल्या हजारो एसटी कामगारांना शिवसेनेच्या प्रयत्नांनंतर तातडीने कामावर घेण्यात आले. त्याबद्दल एसटी कामगारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना भवनात भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली. पुन्हा चूक होणार नाही अशी ग्वाही देतानाच यापुढे भगवा झेंडा खांद्यावर घेऊन काम करणार असल्याचा निर्धार कामगारांनी व्यक्त केला.

शिवसेना भवनात एसटी कामगारांनी कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठी मातेच्या आणि मराठी मातीच्या पुत्रांना न्याय मिळालाच पाहिजे. रस्त्यात धोंडे पेरून राजकारण करणाऱ्यांपासून सावध राहण्याचा सल्ला या कामगारांना देतानाच यापुढे अन्याय झाला असा वास आला तरी माझ्याकडे या असे उद्धव ठाकरे म्हणाले.

संपकाळात शिवशाही बसेसची तोडफोड एसटी कामगारांनी केली होती. शिवशाही फुटल्याचा तो आवाज सहन होण्यासारखा नव्हता असे सांगतानाच उद्धव ठाकरे म्हणाले की, परिवहन मंत्री हे आपलेच असल्याने असा आपल्याच पायावर धोंडा मारू नका नाहीतर तो सेल्फी होऊन आपल्यावरच उलटेल. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी संपकाळात घेतलेला निर्णय हा मंत्र्याचा निर्णय होता पण नंतर कामगारांना पुन्हा कामावर घेऊन त्यांनी शिवसैनिकाची भूमिका बजावली असे ते म्हणाले. बेस्ट सेवा सुरळीत रहावी म्हणूनही काही कठोर निर्णय घ्यावे लागतात अन्यथा जनसामान्यांसाठी असलेली ती सेवाच बंद होते असे उदाहरणही त्यांनी दिले.

रस्ते असोत वा नसोत, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचून आपले कर्तव्य बजावणाऱ्या एसटी कामगारांचे यावेळी उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले. शरीरात वाहणाऱ्या रक्तवाहिन्यांप्रमाणेच राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचणाऱ्या तुम्ही महाराष्ट्राच्या रक्तवाहिन्या आहात असे ते म्हणाले. सरकारने एसटी कामगारांच्या हक्काचे जे आहे ते न मागता दिले पाहिजे अशी शिवसेनेची भूमिका आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना उपनेते, खासदार अरविंद सावंत, भारतीय कामगार सेना महासंघाचे अध्यक्ष सुर्यकांत महाडिक, एसटी कामगार सेनेचे कार्याध्यक्ष शिवाजी चव्हाण आणि पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. संकटाच्या काळात उघडय़ावर टाकणाऱ्या संघटनांपेक्षा एसटी कामगार सेनेचे सभासदत्व स्वीकारावे असे आवाहन यावेळी एसटी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कामगारांना केले.

st-mumbai01