
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
रत्नागिरी पोलीस कवायत मैदानावर आजपासून कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धेला प्रारंभ झाला. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी फुटबॉलमध्ये रायगड, सिंधुदुर्ग, नवी मुंबई, हॉकीत रत्नागिरी, कबड्डीमध्ये नवी मुंबई, रत्नागिरी, खोखोमध्ये नवी मुंबई आणि सिंधुदुर्गने विजयी सलामी दिली.
45व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधी आर.एन.जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे व इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते़ 3 दिवस चालणार्या या स्पर्धेत 6 जिल्ह्यातील 765 खेळाडू सहभागी झाले आहेत.
आज झालेल्या क्रिडा प्रकारात फुटबॉलमध्ये रत्नागिरीचा रायगडने पराभव केला. सिंधुदुर्ग विरुध्द ठाणे ग्रामीणच्या लढतीत सिंधुदुर्गचा संघ विजयी झाला. नवी मुंबई विरुध्द पालघर या लढतीमध्ये नवी मुंबईचा संघ विजयी झाला. व्हॉलीबॉल महिला गटात रत्नागिरी, सिंधुदुर्गने विजय मिळवला. बास्केटबॉल पुरुष गटात नवी मुंबई, रायगडने विजय मिळवला. महिला गटात नवी मुंबई आणि पालघरने विजय मिळवला. हॅण्डबॉलच्या पुरुष गटात सिंधुदुर्ग आणि पालघर आणि व्हॉलीबॉल पुरुष गटात रत्नागिरी संघाने विजय मिळवला.
































































