राज्यातील 59 टक्के विद्यार्थी शाळेत परतले, शहरी भागातील उपस्थिती 46 टक्क्यांवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षी पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास तयार नव्हते. मात्र आता हळूहळू कोरोनाची भिती कमी होत असून शाळांमधील उपस्थितीचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी राज्याच्या ग्रामीण भागात विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण 51.17 टक्के होते. गेल्या चार दिवसांत विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढली असून शुक्रवारी 59.48 टक्के विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली. शहरी भागातही विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण 34.90 टक्क्यांवरून 46.36 टक्क्यांवर पोहोचले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे. अशातच राज्य सरकारने 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याची घोषणा केली. ऑफलाईन वर्गांना विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यात पाचवी ते बारावीच्या 43,030 शाळा असून आठवी ते बारावीच्या 12, 488 शाळा, ज्युनियर कॉलेज आहे. यात 58 लाख 65 हजार 703 विद्यार्थी असून 32 लाख 82 हजार 148 विद्यार्थी आठवी ते बारावीचे आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी 8 ऑक्टोबरला यातील पांचवी ते आठवीच्या 40 हजार 777 (94.76 टक्के) शाळा कॉलेज सुरू झाल्या असून 34,88,631 (59.48 टक्के) विद्यार्थी उपस्थित होते. तर आठवी ते बारावीच्या 15 लाख 21 हजार 739 विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली.

मुंबईत उपस्थिती कमीच

मुंबई विभागातील शाळा, काँल्केजमध्ये विद्यार्थी उपस्थिती सर्वात कमी नोंदविली गेली. मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये आठवी ते बारावीच्या 4 हजार 207 शाळा असून 11 लाख 42 हजार 181 विद्यार्थी आहेत यातील 3 हजार 464 शाळा सुरू झाल्या असून 4 लाख 11 हजार 38 विद्यार्थी उपस्थित होते.a