
सामना प्रतिनिधी, मुंबई
वांद्रे-बीकेसी ते कुर्ला अशा नव्या लोकल मार्गासाठी विचार होत आहे. असा मार्ग झाला तर वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सला जाणाऱया हजारो प्रवाशांचा फायदा होणार आहे. वांद्रे-बीकेसी ते कुर्ला लोकलसाठी राज्य सरकारने मुंबई रेल्वे विकास महामंडळाला (एमआरव्हीसी)एमयूटीपीमध्ये या रेल्वे प्रकल्पाचा समावेश करून त्याची व्यवहार्यता तपासावी, असे आदेश दिले आहेत.
मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प (एमयूटीपी)-3 मध्ये या मार्गिकेचा प्रस्ताव होता, परंतु एमएमआरडीएने नोटीफिकेशन काढून वांद्रे-कुर्ला रेल्वे मार्गिकेचा प्रस्ताव येथून ‘मेट्रो 2- अ’ आणि ‘ब’ तसेच चारकोप वांद्रे -मानखुर्द मेट्रो लिंक अशा मार्गांमुळे पूर्व ते पश्चिम उपनगरे जोडली जाणार असल्याने फेटाळून लावला होता. परंतु पश्चिम रेल्वेने मेट्रो 36 हजार प्रवाशांना वाहून घेऊ जाऊ शकत नाही. मेट्रो रेल्वेला पर्यायी व्यवस्था नसून केवळ पूरक व्यवस्था असल्याचे पश्चिम रेल्वेने म्हटले आहे. दरवर्षी येथून ऑटो रिक्षा व बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या तीन कोटी आहे. त्यामुळे येथून वांद्रे ते बीकेसी लोकल चालविण्याची मागणी होत आहे.
पश्चिम रेल्वे मध्य रेल्वेला जोडली जाणार
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकाराद्वारे मिळविलेल्या माहितीनुसार पश्चिम रेल्वेने हा मार्ग म्हणजे काळाजी गरज असून येथे प्रवाशांची संख्या वाढतच आहे. वांद्रे-बीकेसी ते कुर्ला मार्गामुळे पश्चिम रेल्वे मध्य रेल्वेला जोडली जाणार आहे. रेल्वे बोर्डाने या मार्गात रस दाखविला असून तो पुनर्जीवित होण्याची चिन्हे असून व्यवहार्यता तपासली जाणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.




























































