एसटीतील वाहकांची विशेष तपासणी रद्द करावी, प्रवाशांसमोर अपमान होत असल्याने महाराष्ट्र एसटी कामगार सेनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांगली विभागातील इस्लामपूर आगारातील एका वाहकाने मोबाईल प्रिंटर आणि त्यामध्ये महामंडळाचे तिकीट रोल टाकून मोबाईल अॅपद्वारे बनावट तिकीट प्रवाशांना देऊन अपहार केल्याचे प्रकरण उघडकीस आल्याचे एसटी महामंडळाच्या एका पत्रकात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर विशेष तपासणी मोहीमेअंतर्गत राज्यभरातील सर्व वाहकांचे इटीआय मशीन, मोबाईल, अॅप, त्यांची बॅग, लॉकर आणि खिसे तपासून त्याचे व्हिडियो चित्रीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, यातून एसटी वाहकाची बदनामी होत असून जनमानसामध्ये प्रतिमा मलिन होऊ शकते. त्यामुळे संबंधित आदेश रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने एसटी महामंडळाला केली आहे.

राज्यभरातील वाहक हे जणू काही केवळ चोरी करण्याचे काम करत आहेत, असा विचार करूनच हे आदेश दिल्याचे दिसून येते. तपासणीदरम्यानच्या कार्यपद्धतीमध्ये मानवी मूल्यांचे उल्लंघन आणि संविधानाने दिलेल्या हक्क अधिकाराचा बिनदिक्कतपणे भंग करण्यात आल्याचे महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने म्हटले आहे. राज्य परिवहन बस हे सार्वजनिक वाहन आहे. या बसमध्ये तपासणी करणाऱया अधिकाऱयांनी प्रवाशांसमोर वाहकाची नाचक्कीकरून त्याची झडती घेण्याच्या आणि त्याचे खिसे तपासणे या प्रकारामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने म्हटले आहे.

माझी एसटी म्हणून काम करण्याची भावना संपेल
एसटीतील वाहक हेच महामंडळ आणि जनता यांमधील दुवा म्हणून काम करत असतात. त्यामुळे त्यांच्यावर अविश्वास दाखवणे आणि त्यांना प्रवाशांसमोर अपमानित करणे हा प्रकार सर्वस्वी निंदनीय आहे. अशा तपासण्यांमुळे वाहकांची माझी एसटी म्हणून काम करण्याची भावना संपेल अशी भीतीही महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे आपले आदेश त्वरित रद्द करावेत आणि कर्मचाऱयांमधील असंतोष कमी करावा अशी विनंती महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी एसटी महामंडळाला केली आहे.