
मुलगी बाप मानत नसल्याच्या रागातून सावत्र बापाने पंचगंगा नदीत ढकलून देत तिचा खून केल्याची घटना सोमवारी रात्री हातकणंगले तालुक्यातील यळगुड येथे घडली आहे. याप्रकरणी हुपरी व इचलकरंजी पोलिसांनी मुलीच्या सावत्र बापाला अटक केली आहे. दरम्यान, या मुलीचा मृतदेह आज सकाळी पंचगंगा नदीच्या पुलाखाली आढळून आला.
प्रणाली साळुंखे (वय 9, रा. यळगुड, ता. हातकणंगले) असे मृत मुलीचे नाव असून, युवराज साळुंखे असे अटक केलेल्याचे नाव आहे. युवराज साळुंखे यांची दोन लग्ने झाली होती. मात्र, त्या दोघींना अपत्य होत नसल्याच्या कारणावरून त्याने सोडचिठ्ठी देऊन इचलकरंजीतील एका मुलगी असलेल्या महिलेशी विवाह केला होता. मात्र, त्या महिलेची मुलगी प्रणाली युवराजला बाप समजत नव्हती. या गोष्टीचा राग आल्याने युवराज याने प्रणालीला पंचगंगा नदीत ढकलून दिले. तत्पूर्वी कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याने प्रणाली बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र, हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, पोलीस उपनिरीक्षक विजय मस्कर यांच्या टीमला संशय आल्याने युवराजची कसून चौकशी केली. त्यानंतर त्याने प्रणालीला पंचगंगा नदीत ढकलून दिल्याची कबुली दिली. आज सकाळी हुपरी व इचलकरंजी पोलिसांनी एकत्रित शोध मोहीम राबवत इचलकरंजी येथील पंचगंगा नदी पुलाखालून मृतदेह शोधून काढला. आयजीएम रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.




























































