निवृत्ती? छे इतक्यात नाही! स्टीव्ह स्मिथच्या निवृत्तीच्या वृत्ताबाबत मॅनेजरचा खुलासा 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डेव्हिड वॉर्नरप्रमाणे स्टीव्ह स्मिथही पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत कसोटीतून निवृत्त होणार असल्याची बातमी वाऱयासारखी पसरली. पण हे वृत्त अफवा असल्याचे स्मिथचा मॅनेजर वॉरेन व्रेगने स्पष्ट केल्यानंतर यावर पडदा पडला. स्मिथ इतक्या लवकर कसोटीतून निवृत्त होत नाहीय. अजून त्याला खूप गोष्टी करायच्या असल्याचे स्पष्ट केले.

स्टीव्ह स्मिथला ऑस्ट्रेलियन संघाबरोबर आणखी काही ध्येय साध्य करायचे आहेत. त्याला कसोटीत दहा हजार धावांचा टप्पा गाठायचा आहे. जूनमध्ये वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत होत असलेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळायचे आहे. एवढेच नव्हे तर 2024 मध्ये हिंदुस्थानविरुद्ध होणाऱया कसोटी मालिकेतही त्याला खेळण्याची इच्छा असल्याचे मॅनेजर वॉरेन व्रेग म्हणाला. त्यामुळे स्मिथ इतक्यात निवृत्त होत नाहीय. त्याला अजूनही राष्ट्रीय संघासोबत आणखी काही गोष्टी मिळवायच्या असल्याचेही तो म्हणाला.

पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत डेव्हिड वॉर्नर निवृत्त होत असल्यामुळे अचानक स्टीव्ह स्मिथच्या नावाचीही चर्चा सुरू झाली होती. येत्या 14 डिसेंबरपासून पर्थमध्ये पहिला कसोटी सामना खेळला जाणार असून दुसरा सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये तर तिसरा 3 जानेवारीपासून सिडनीत खेळला जाईल. वॉर्नरप्रमाणे स्मिथही सॅण्डपेपर गेट प्रकरणात दोषी असल्यामुळे त्याच्या निवृत्तीबाबत गंभीर चर्चा सुरू झाली होती. ती काही तासानंतर शांत झाली.

स्मिथ आतापर्यंत 102 कसोटी, 155 वन डे आणि 65 टी-20 क्रिकेट सामने खेळला आहे. कसोटीत तर त्याने 59.62 च्या सरासरीने 9320 धावा काढल्या आहेत. ज्यात 32 शतके आणि 39 अर्धशतके ठोकली आहेत. वन डेतही त्याने 12 शतके आणि 32 अर्धशतके साजरी करताना 5356 धावा केल्या आहेत.