
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी खेळाडू स्टिव्हन स्मिथने आपल्याच देशाचे महान खेळाडू सर डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी केली. वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात स्मिथने कारकिर्दीतील 29वे शतक झळकावीत ब्रॅडमन यांना गाठले. 87व्या कसोटीतील 154व्या डावात स्मिथने ब्रॅडमन यांच्या 29 शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली. मात्र, ब्रॅडमन यांनी केवळ 52 कसोटीतील 80 डावांत 29 कसोटी शतके झळकविली होती, हे विशेष.
स्मिथने 311 चेंडूंचा सामना करत 17 चौकारांच्या साह्याने नाबाद 200 धावांची खेळी सजविली. त्याच्याआधी मार्नस लाबुशेन यानेही (204) द्विशतकी खेळी केली. ट्रविस हेड 99 धावांवर बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने 152.4 षटकांत 4 बाद 598 धावसंख्येवर आपला पहिला डाव घोषित केला.




























































