हिंदुस्थानी सैन्यावर पुन्हा दगडफेक, तीन नागरिकांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू कश्मीर येथील कुलगाम जिल्ह्यात हिंदुस्थानी सैन्यावर शनिवारी पुन्हा दगडफेक करण्यात आली. येथील खुदवाणी या गावात हिंदुस्थानी सैन्याची शोधमोहीम सुरू असताना काही तरुणांनी सैन्यावर दगडफेक केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून झालेल्या चकमकीत तीन नागरिकांचा मृत्यू झाला असून यात एका लहान मुलीचाही समावेश आहे. तर ३ जवानांसहित १३ हून अधिक जखमी झाले आहेत.

या घटनेनंतर कुलगाम आणि अनंतनाग इथली इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. कुख्यात दहशतवादी बुऱ्हाण वाणी याच्या मृत्युला दोन वर्षं पूर्ण झाल्याप्रित्यर्थ फुटीरतावाद्यांनी रविवारी कश्मीर बंदचं आवाहन केलं आहे. या बंद दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी हिंदुस्थानी सैन्याने पुलवामा आणि त्रालसहित अनेक भागांमध्ये कर्फ्यू जारी केला आहे.

याखेरीज सुरक्षेच्या कारणास्तव रविवारी येथून जाणाऱ्या अमरनाथ यात्रेलाही रोखण्यात आलं आहे. त्यामुळे जवळपास एक हजार अमरनाथ यात्रेकरू कठुआ येथे थांबले आहेत. तसंच १५ हजारांहून पर्यटकांना जम्मू, उधमपूर आणि रामबाण या जिल्ह्यांत थांबवण्यात आलं आहे. या बंददरम्यान दहशतवादी हल्ल्यांना रोखण्यासाठी श्रीनगर राष्ट्रीय महामार्गाच्या आसपास ३०० किलोमीटरपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.