
>> शिरीष कणेकर
सकाळपासून रात्रीपर्यंतचा खुराक.
सकाळी उठल्यावर रोझमेरी चहा किंवा एक ग्लास नारळपाणी.
नाश्त्यामध्ये शर्करामुक्त दूध, एक चमचा जवस किंवा सूर्यफुलाच्या बिया किंवा टरबूज किंवा चिया सीडस्, पाच-सहा बदाम, एक आक्रोड, दोन पीकन नटस्.
जेवणाआधी बीट, काकडी, आवळा, तुळस, गाजराचा किंवा कलिंगडाचा रस, टरबूज, किवी, पेरूचा ज्यूस, मोड आलेले काळे चणे, हिरवे चणे, काकडी, टोमॅटो, अर्धे लिंबू व आवाकाडो.
दुपारच्या जेवणात एक वाटी काकडी, मोसमानुसार पालेभाज्या, ज्वारी किंवा शिंगाडा किंवा नाचणीची एक भाकरी.
संध्याकाळच्या नाश्त्याला ‘फॅट-फ्री’ दुधाचा एक कप चहा, अर्ध्या लिंबासह 25 ग्रॅम पनीर किंवा टोफू.
रात्रीच्या जेवणात विविध प्रकारच्या भाज्या डाळीचे किंवा काळय़ा चण्याचे सूप आणि एक वाटी तळलेल्या हिरव्या भाज्या.
रात्री झोपण्यापूर्वी एक कमोमाइल चहा व गरम पाण्याबरोबर विशिष्ट प्रकारच्या बियांचा चुरा.
एक वर्ष कारावासासाठी पतियाला कारागृहात रवाना झालेला काँग्रेस नेता नवज्योतसिंग सिद्धू याला डॉक्टरांनी सांगितलेला व न्यायमूर्तींनी स्वीकारलेला खाण्यापिण्याचा मेनू वर दिलाय. हे असं खाऊन सिद्धू वर्षभरात गामा पहेलवान बनून बाहेर पडेल. तुरुंगाच्या दरवाजातून तो बाहेर पडू शकेल की नाही हा प्रश्न आहे. ठोको ताली!
पासष्ट वर्षांच्या वृद्धाला धक्काबुक्की व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा सिद्ध होऊन सिद्धूला शिक्षा झाली आहे. राजकारण्यांना शोभेशा धीरोदात्तपणे सिद्धू शिक्षेला सामोरा गेलाय. तुमची आमची बायको माहेरी गेली तरी आपले जेवणाचे वांधे होतात. सिद्धू (एकटा) तुरुंगात गेल्यावरही शरीरसंवर्धन करणारा त्याचा आहार व्यवस्थित चालू राहणार आहे. आसारामबापूंचा महिला संपर्कही तुरुंगात अविरत चालू ठेवण्यास तिथल्या न्यायमूर्तींनी परवानगी दिली असेल काय? अन् दिली असेल तर बापू कशाला बाहेर येतील? ठोको ताली!
तुरुंग ही इतकी हवीहवीशी वाटणारी, लोभसवाणी, आरामदायी जागा होईल हे पूर्वी माहीतच नव्हतं. सावरकरांनी अंदमानला अनन्वित छळ सोसला. आज त्यांनी ‘सिद्धूगिरी’ पाहिली असती तर ते स्वखुशीनं पुन्हा अंदमानला गेले असते.
गुन्हा सिद्ध होऊन नेतेमंडळी तुरुंगात जातात. ते बाहेर आल्यावर त्यांचे ढोलताशे वाजवून जंगी स्वागत केले जाते. (उदा. लालुप्रसाद यादव). तुरुंगवास हा ठपकाच राहिलेला नाही, तो कारकीर्दीवरचा डाग मानला जात नाही. सगळय़ा व्याख्याच बदलल्यात. इंग्रजांविरुद्ध लढून तुरुंगात जाणारे आणि भ्रष्टाचाराच्या सिद्ध आरोपात गजाआड जाणारे सारखेच. तुरुंग तो तुरुंग. या आरोपात काय आणि त्या आरोपात काय. तुम्ही बाहेर या, आम्ही आहोतच स्वागताला तयार.
तुरुंगात गेल्याक्षणी यांना काय काय आजार उद्भवतात. मग विविध तपासण्या आल्याच. ‘बिन-ए.सी.’ तुरुंगात राहण्यापेक्षा ‘फाइव्ह-स्टार’ हॉस्पिटलात आराम करणे केव्हाही चांगले. ठोको ताली!
सिद्धू शाकाहारी नसता तर त्याचं ‘डाएट’ आमूलाग्र बदललं असतं व त्याच्या कोठडीतून पशुपक्ष्यांचे चित्कार ऐकू आले असते. तो स्वतः गर्दभचर्मावर पहुडला असता. त्याच्या चेहऱयावर वकार युनुसनं भोपळय़ावर दांडी उडाल्याचे भाव असते. एका हातात पापलेट व दुसऱया हातात सुरमई धरून टाळी वाजवता येत नाही हे त्याला प्रथमच उमगले असते. त्याच्या ‘ठोको’ शब्दावर चेतेश्वर पुजारानं ‘इंजंक्शन’ आणलं असतं.
टी.व्ही.वरच्या कपिल शर्माच्या कार्यक्रमात सिद्धू काहीतरी मजेदार बोलायचा व स्वतःच म्हणायचा,- ‘ठोको ताली!’
आता तुरुंगात अन्य कैद्यांच्या साक्षीनं तो गरजत असेल,- ‘ठोको ताली.’
माझा एक पासष्ट वर्षांचा भाचा आहे. त्याला बदडून मी सिद्धूच्या तुरुंगात जाऊ शकेन का? मग आम्ही दोघं मिळून एका सुरात ओरडू,- ‘ठोक ताली…’


























































