शिवराज्याभिषेकाची जादू साऱ्या जगावर!

175

>> नमिता वारणकर

राहुल ठाकरे या विद्यार्थ्याने स्ट्रिंग आर्टच्या माध्यमातून रेखाटलेल्या शिवराज्याभिषेकाच्या चित्राची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली आहे.

स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी गोंदिया जिह्यातला एक विद्यार्थी पुणे विद्यापीठात येतो. तिथे ‘कमवा आणि शिका’ या योजनेअंतर्गत काही विद्यार्थी तीच तीच कामे पुनः पुन्हा करतात. म्हणून आपण या कामांपेक्षा काहीतरी नवे आणि कौशल्यपूर्ण काम करावे या उद्देशाने ‘स्ट्रिंग आर्ट’ कलेतील कलाकृती स्वतः शिकतो… इतर विद्यार्थ्यांनाही शिकवतो…त्या साकारल्यानंतर शिवराज्याभिषेकाचे मोठे चित्र तो तयार करते. विशेष म्हणजे, चित्रकलेचा कोणताही छंद नसतानाही त्याने स्ट्रिंग आर्टद्वारे काढलेल्या या चित्राची दखल चक्क ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ आणि ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये घेतली जाते. त्या मेहनती, गुणी कलाकाराचे नाव आहे ‘राहुल ठाकरे’!

एकदा एका परिचितांनी शिवराज्याभिषेकाची मोठी कलाकृती साकारण्याविषयी सुचवले. त्यानंतर अभ्यास सांभाळून जवळपास सहा महिने दररोज किमान सात तासांचा वेळ चित्र पूर्ण करण्यासाठी दिला. प्लायवूडवर कॉटन लावून सुरुवातीला त्यावर शिवराज्याभिषेकाचं स्केच काढलं. मग त्यावर 42 हजार 810 खिळे ठोकून 8 फूट लांबीचे आणि 4 फूट रुंदीचे चित्र रंगीबेरंगी धाग्यांच्या माध्यमातून जिवंत केले. या कलेत परिपूर्णता यावी यासाठी घेतलेल्या मेहनतीविषयी राहुल ठाकरे सांगतो, माझा व्यावसायिक आणि शैक्षणिक सहभाग यामध्ये नव्हताच. यासाठी या कलेतील प्रोफेशनल कलाकारांना वेगवेगळय़ा ठिकाणच्या गॅलरीत जाऊन भेटलो. त्यांना माझ्या कलाकृतींविषयी सांगितले. तिथे लक्षात आले की, स्ट्रिंग आर्ट कलाकार महाराष्ट्रात अगदीच कमी आहेत. त्यामुळे स्ट्रिंग आर्टच्या प्रसाराची आवश्यकता लक्षात आली. त्यानंतर दोनशेहून अधिक जणांना थ्रेड वर्कद्वारे चित्र काढायला शिकवले. शिकवता शिकवता यामध्ये परिपूर्णता येऊ लागली.

एवढी मोठी कलाकृती साकारताना काय अडचण आली यावर त्याचं म्हणणं आहे, स्ट्रिंग आर्टसाठी लागणारे खिळे, दोरे, प्लायवूड घेण्यासाठी आर्थिक मदतीचीही गरज होती. यासाठी माझ्या मित्रमैत्रिणींनी मदत केली. शिवराज्याभिषेकाची कलाकृती साकारण्यासाठी एक महिन्याचा कालावधी फक्त खिळे ठोकण्यासाठीच लागला आहे. काही महिन्यांनंतरही चित्र पूर्ण होत नव्हतं त्यामुळे आता सोडून द्यावं असाही विचार मनात आला. तरीही मित्रांच्या सहकार्याने, त्यांनी दिलेल्या प्रेरणेमुळेच अखेर चित्र पूर्ण झालं. पहिल्याच दिवशी सोशल साइटवर त्याच्या व्हिडीओला दोन लाख लाइक्स मिळाले.

पुणे आर्ट फेस्टिव्हलमध्ये लाइव्ह डेमो
पुण्यात 26 ते 29 डिसेंबरदरम्यान होणाऱ्या ‘पुणे आर्ट फेस्टिव्हल’मध्ये स्ट्रिंग कलाकार राहुल ठाकरे खिळे आणि दोऱयांच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र आपल्या स्ट्रिंग कलेद्वारे साकारणार आहेत. याचे वैशिष्टय़ असे की, त्यांच्या चित्राचा लाइव्ह डेमो रसिकांना या महोत्सवात पाहायला मिळेल.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या