
सामना ऑनलाईन, मुंबई
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील ‘हिमालय’ पूल दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी आज या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करणाऱ्या नीरजकुमार देसाई याला बेडय़ा ठोकल्या. गेल्या गुरुवारी या पुलाचा स्लॅब कोसळल्याने सहा मुंबईकरांना नाहक आपले प्राण गमवावे लागले. देसाई याने या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. ते चुकीचे होते असा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. या प्रकरणात ही पहिली अटक असून आणखी काही जण रडारवर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पूल दुर्घटनेनंतर महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर अत्यंत निष्काळजीपणे या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. नीरज देसाई याच्या कंपनीने हे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. महापालिकेने हा चौकशी अहवाल पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हय़ातील 304 अ हे कलम काढून 304 (2) या नव्या कलमाखाली गुन्हा दाखल केला.
देसाईचा कारनामा
पालिकेच्या पादचारी पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे काम ‘डी. डी. देसाईज् असोसिएट इंजिनीयरिंग कन्सल्टंट ऍण्ड ऍनालिस्ट प्रा. लि.’ कंपनीला देण्यात आले होते. नीरजकुमार हाच कंपनीचे सर्व काम पाहतो. कंपनीने 2016-17 मध्ये हिमालय पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. मग 2018 मध्ये हा पूल ’गुड कंडिशन’मध्ये असल्याचा अहवाल पालिकेला दिला होता. त्यानंतर स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये सुचविल्यानुसार पुलाची किरकोळ डागडुजीदेखील करण्यात आली होती; पण पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट व्यवस्थित न झाल्यामुळे हा पूल कोसळला. नीरजकुमार देसाई हा स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात तज्ञ आहे. त्यामुळे भविष्यात पुलाच्या बाबतीत कोणतीही दुर्घटना घडणार नाही याची काळजी घेण्याचे काम नीरजकुमार देसाईचे होते; पण त्याने कामात निष्काळजीपणा केला, म्हणूनच पूल कोसळल्याची दुर्घटना घडली. याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून नीरजकुमारला अटक केल्याचे त्रिमुखे म्हणाले
देसाई साकीनाक्यात सापडला
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्याची खबर मिळताच नीरजकुमार देसाई गायब झाला. पोलीस त्याच्या मागावरच होते. अखेर तो साकीनाका येथे सापडल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन आझाद मैदान पोलिसांनी अटक केल्याचे उपायुक्त त्रिमुखे यांनी सांगितले.
मुख्य अभियंत्यासह अनेकांचे जबाब
पालिकेचे मुख्य अभियंता संजय दराडे यांचा प्राथमिक जबाब नोंदविण्यात आला आहे. पादचारी पुलाची देखभाल, दुरुस्ती आदी काम कसे होते याबाबत माहिती घेण्यात आली. शिवाय दुर्घटनेतील जखमी तसेच काही प्रत्यक्षदर्शींचेदेखील जबाब घेण्यात आल्याचे उपायुक्त त्रिमुखे म्हणाले.






























































