नीरज देसाईची रवानगी न्यायालयीन कोठडीत, आणखी दोन कंपन्यांच्या प्रमुखांची चौकशी

17

सामना ऑनलाईन । मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील ‘हिमालय’ पादचारी पूल कोसळून सहा पादचारी ठार झाले. या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटर नीरज देसाई याची कोर्टाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. नीरज देसाईच्या पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपल्याने त्याला कोर्टात हजर करण्यात आले होते. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी आणखी अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.

‘हिमालय’ पादचारी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट नीरज देसाईच्या डी.डी. देसाईज कंपनीने केले होते. कंपनीने हा पूल गुड कंडिशनमध्ये असल्याचा अहवाल तेव्हा दिला होता. मात्र तरीही हा पूल कोसळला आणि त्यात सहा पादचाऱ्यांचा नाहक बळी गेला. या अपघाताला डी.डी. देसाई कंपनीचा बेफिकीरपणा जबाबदार असल्याचे समोर आल्याने आझाद मैदान पोलिसांनी कंपनीचे प्रमुख नीरज देसाईला अटक केली होती. त्याला कोर्टात हजर केले असता 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्याने देसाईला आज पुन्हा कोर्टात हजर केले होते. कोर्टाने आज देसाईला 10 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, या प्रकरणात आणखी अटकेच्या कारवाया होतील, असे उपायुक्त त्रिमुखे यांनी सांगितले.

हिमालय पुलाची नॉन ड्रिस्ट्रीक्टिव्ह टेस्ट करणारे जियो डायनामिक कंपनीचे प्रमुख रविकिरण वैद्य तसेच डी.डी. देसाईज कंपनीच्या अहवालानंतर पुलाच्या डागडुजीचे काम करणाऱ्या वित्राग इंटरप्रायझेज कंपनीचे गुमानसिंग राठोड यांचीही चौकशी करण्यात आली असून त्यांचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला आहे. शिवाय पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले त्या वेळेस पालिकेत कार्यरत असणारे अधिकारी चौकशीसाठी येत नसल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या