कंटेनरची धडक बसल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । राहुरी

भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरची धडक बसल्याने मोटरसायकलवरून घराकडे परतणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा दुदैवी मृत्यू झाला आहे. अपघातात ठार झालेल्या मयूरचा गुरूवारी बारावीचा पेपर होता.

नगर मनमाड राज्य मार्गावरील राहुरीच्या मुळा नदी पुलाजवळ भीषण अपघाताची ही घटना घडली. मयूर लक्ष्मण गोरड (१८) राहणार राहुरी खुर्द हा महाविद्याल्यीन विद्यार्थी घराकडे परतत होता. मुळा नदी पुलाजवळ आल्यानंतर नगरकडून मनमाड दिशेला चाललेल्या आर. जे. २५ जे. ए. ३१८९ हा कंटेनर विरूध्द दिशेला घुसून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असताना समोरून आलेली मयूरची मोटरसायकल कंटेनरला धडकली.

अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी झालेल्या मयूरला उपचारार्थ नगरच्या खाजगी दवाखान्यात हलविण्यात मदतकार्य केले मात्र रस्त्यातच मयूरची प्राणज्योत मालवली. राहुरी येथे शव विच्छेदनानंतर मयूरचा मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेने राहुरी खुर्द परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.