
देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात टेलिग्रामवर ग्रुप तयार करून सायबर गुन्हेगारांकडून शेकडो विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक करण्यात आली. विशेष म्हणजे, ही संपूर्ण फसवणूक टेलिग्रामच्या माध्यमातून अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने करण्यात आली. आतापर्यंत सुमारे 5.74 कोटी रुपयांहून अधिक रक्कम उकळण्यात आल्याचे समजते.
तपास यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सायबर भामट्यांनी टेलिग्रामवर ‘लीक पेपर’, ‘गॅरंटी सिलेक्शन’, ‘100 टक्के यश’ आणि ‘फुलप्रूफ सिस्टम’ असे काही ग्रुप तयार करण्यात आले होते. नीट परीक्षेच्या तणावाखाली असलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना लक्ष्य करत या ग्रुप्समध्ये प्रवेश देण्यासाठी सुरुवातीला फक्त 200 ते 500 रुपयांची फी आकारण्यात आली. पालकांचा विश्वास संपादन केल्यानंतर सायबर गुन्हेगारांनी त्यांना 60 हजार रुपयांचे टोकन दिले. महत्त्वाचे म्हणजे परीक्षेच्या दिवशी सकाळीच मूळ प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देऊ, असा दावा करत प्रत्येक विद्यार्थ्याकडून 10 लाख रुपये उकळण्यात आले.
गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू
या प्रकरणी विविध राज्यांमध्ये सायबर गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू असून टेलिग्रामवरील अनेक संशयित ग्रुप्स आणि आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेतला जात आहे. या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. तपास यंत्रणांनी नागरिकांना अशा कोणत्याही फसव्या जाहिरातींना किंवा सोशल मीडियावरील दाव्यांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा करणाऱया कोणत्याही व्यक्ती किंवा ग्रुपची माहिती त्वरित सायबर पोलिसांना देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
‘नीट’ रद्द झाल्याने 92 टक्के मिळवलेल्या मुलीची आत्महत्या
कर्नाटकच्या कलबुर्गी जिह्यातील एका 18 वर्षीय मुलीने आत्महत्या केली. तिने नीट परीक्षा दिली होती. यासंदर्भात तिच्या वडिलांना सांगितले की, त्यांच्या मुलीने बारावीत (पीयूसी) 92 टक्के गुण मिळवले होते. नीट परीक्षाही तिची चांगली झाली होती. कुटुंबात कोणतीही अडचण किंवा तणाव नव्हता. आमचे आनंदी कुटुंब होते. ती परीक्षेत चांगली कामगिरी करून आली होती. मात्र पुन्हा नीट परीक्षा द्यावी लागणार, या विचारामुळे तिच्या मनात तणाव निर्माण झाला असावा. तिच्या भावना आम्हाला समजू शकल्या नाहीत, असे त्यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनीने कोणतीही चिठ्ठी लिहून ठेवलेली नाही. या प्रकरणी स्टेशन बाजार पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सुरू आहे.




























































