तब्बल 35 तासांनी एक्प्रेस-वेवरील वाहतूककोंडी सोडविण्यात यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शनिवार, रविवार आणि नाताळच्या जोडून आलेल्या सुट्टय़ांमुळे नागरिक मोठय़ा प्रमाणात घराबाहेर पडले. याचाच परिणाम म्हणून मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर मोठय़ा प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. ही वाहतूककोंडी सोडविण्यात पोलिसांना तब्बल 30 ते 35 तासांनी यश आले.

सलग सुट्टय़ा आल्याने एक्स्प्रेस-वेवर वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढली होती. शनिवारी रात्री तर 10 ते 12 किमीच्या रांगा लागल्या होत्या. त्यात महामार्गावर अनेक वाहने बंद पडल्याने नागरिकांना मोठय़ा वाहतूककोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला. वाहतूककोंडी झाल्याने रात्रभर महामार्ग जाम झाला होता.

रायगड महामार्ग पोलिसांकडून मुंबईहून पुण्याला येणारी लेन आणि पुण्याहून मुंबईला जाणारी लेन या दोन्हीही लेनवर मुंबईकडून येणारी वाहतूक सुरू केल्याने बोरघाटातील वाहतूककोंडी 35 तासांनी नियंत्रणात आली आहे.

लहान मुलांचे हाल
अनेक जण कुटुंबासह फिरण्यासाठी बाहेर पडले, मात्र त्यांना द्रुतगती महामार्गावर तासन्तास अडकून पडावे लागले. त्यामुळे मोठा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागला. ज्यांच्यासोबत लहान मुले होती त्यांचे मोठे हाल झाले.

मावळातील विविध पर्यटनस्थळांवर गर्दी
मावळ तालुक्यातील लोणावळा, खंडाळा, पवना धरण परिसर, कार्ला-भाजे, बेडसे लेणी, शिरगाव प्रतिशिर्डी येथील साईमंदिर आदी पर्यटनस्थळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. या पर्यटकांमुळे पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे टोलनाका, वडगाव फाटा, कामशेत, कार्ला फाटा, पवनानगर आदी परिसरात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली.