
सामना प्रतिनिधी । बीड
भीषण दुष्काळाने रोज आत्महत्या होत आहेत. गावागावात मृत्युचे तांडव दिसत आहे. यातच आज एका बेरोजगार तरूणाने रोजगार मिळवण्यासाठी केलेली धडपड वाया गेल्यानंतर कर्ज मिळावे म्हणून प्रयत्नाची पराकाष्टा केली. लाच दिली तरीही कर्ज न मिळाल्याने समाजकल्याण खात्यातील भ्रष्टाचाराचे लक्तरे वेशिला टांगणारा व्हिडिओ तयार करून पाली येथील बिंदुसरा धरणात उडी मारत आत्महत्या केल्याची घटना बीडमध्ये घडली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
केज तालुक्यातील साळेगाव येथील संजय ताकतोडे या युवकाने आज बिंदुसरा धरणामध्ये उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. मात्र आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली आणि आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढला. त्यात मातंग समाजाच्या आरक्षणासाठी आपण टोकाचे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बिंदुसरा तलावाच्या काठावर मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आणि मोबाईल सापडल्या गेल्या. त्यातील हा व्हिडिओ बघितल्यानंतर संजय ताकतोडे यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी शोधाशोध केली असता दुपारी संजय ताकतोडे यांचा मृतदेह हाती लागला. केवळ रोजगार मिळत नाही आणि शासन दुर्लक्ष करत आहे म्हणून या तरूणाने आत्महत्या केली आहे. या तरूणाने शासकीय व्यवस्थेचा हलगर्जीपणा उघड केला आहे. आपल्या व्यवसाय असावा यासाठी समाजकल्याण विभागामध्ये फाईल दाखल केली, फाईल मंजूर करण्यात यावी म्हणून सतत पाठपुरावा केला. संबंधित अधिकाNयांना ४० हजार रूपयाची लाचही दिली मात्र फाईल मंजूर झाली नाही. समाजकल्याण खात्यातील अधिकारी सामान्य लोकांचे काम करत नाहीत असे त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. या गंभीर घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.





























































